पंधरा मिनिटांच्या भेटीत उलगडले जुन्या आठवणींचे बंध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नाशिक रोड - आठ दिवसांपूर्वी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे मला भेटण्यास येणार असल्याचे पत्र मिळाले. अतिशय आनंद झाला. मी या दिवसाची वाट पाहत होतो. तो दिवस आला. या भेटीने जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. श्रीनिवास पाटील यांनी महाविद्यालयीन मित्र प्रा. बी. डी. कुशारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या पंधरा मिनिटांच्या भेटीत जुन्या आठवणींचे बंध चर्चेतून हळूहळू उलगडत गेले.

नाशिक रोड येथील गायखे कॉलनीतील सप्तशृंगी सोसायटीत राहणारे चांडक-बिटको महाविद्यालयातील निवृत्त प्रा. डी. बी. कुशारे यांच्या निवासस्थानी काल (ता. १६) दुपारी अडीच सुमारास राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी भेट दिली. या वेळी नुकतेच ८१ वर्षांत पदार्पण करणाऱ्या प्रा. कुशारे यांचा राजपाल पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी प्रा. कुशारे यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे व जावई असे परिवारातील सदस्य उपस्थित होते. 

प्रा. कुशारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, की १९५९ ते १९६१ या कालावधीत मी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात श्री. पाटील यांच्यासोबत शिकायला होतो. एका वसतिगृहात रूमपार्टनर होतो. पाटील अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होते. आम्हा दोघांनाही कबड्डी, खो-खो आवडायचे. कबड्डीत मला रस होता. त्यामुळे त्यांनी माझे नाव बल्ला असे ठेवले होते. त्या नावानेच मला ते हाक मारायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात क्रीडाशिक्षक म्हणून नोकरीस लागलो; परंतु यानंतर आम्ही नेहमी संपर्कात राहून स्नेह जपला. 

प्रा. कुशारे यांच्या कुटुंबीयांनी राज्यपालांना औक्षण करून स्वागत केले. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, व्यापारी बॅंकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, शंकर औशीकर, दादा बोडके आदी उपस्थित होते. पंधरा मिनिटांच्या भेटीनंतर राज्यपाल पाटील संगमनेरकडे रवाना झाले.

Web Title: shrinivas patil visit to b. d. kushare