‘श्‍यामा फायर’मध्ये काम बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

जळगाव - शिरसोलीजवळील (ता. जळगाव) ‘श्‍यामा फायर वर्क्‍स इंडस्ट्रीज’ या फटाक्‍याच्या कारखान्यात मंगळवारी (ता. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला; तर महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ‘श्‍यामा फायर’ या कारखान्यात कामबंद असल्याने स्मशानशांतता पसरली होती. कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज कारखान्यात येऊन चौकशी केली.

जळगाव - शिरसोलीजवळील (ता. जळगाव) ‘श्‍यामा फायर वर्क्‍स इंडस्ट्रीज’ या फटाक्‍याच्या कारखान्यात मंगळवारी (ता. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला; तर महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ‘श्‍यामा फायर’ या कारखान्यात कामबंद असल्याने स्मशानशांतता पसरली होती. कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज कारखान्यात येऊन चौकशी केली.

‘श्‍यामा फायर’ फटाका कारखान्यात मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे राजेंद्र बाबूराव तायडे (वय ३५) आणि हेमंत प्रेमलाल जयस्वाल (वय ४५) मसाला दारू मिक्‍सिंगच्या खोलीत काम करीत होते. अचानक या खोलीतील दारूगोळ्याचा भीषण स्फोट होऊन खोलीच्या ठिकऱ्या उडाल्या. काम करणारे दोन्ही कामगार या अपघातात जागीच ठार झाले. स्फोट झाला, त्यावेळी गीताबाई कन्हय्या मोची (वय ३८, रा. फुकटपुरा, इच्छादेवी) या बाजूने जात असताना त्यांच्या डोक्‍यात स्फोटातील भिंतीच्या विटा लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कारखान्यात स्मशानशांतता
मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे आज ‘श्‍यामा फायर वर्क्‍स इंडस्ट्रीज’ कारखान्यात काम बंद ठेवण्यात आले होते. तेथे केवळ पोलिस कर्मचारी, कारखान्यातील काही कामगार आणि मालक विशन मिलवाणी उपस्थित होते. कंपनीचे सर्व कामगार राजेंद्र आणि हेमंत यांच्या अंत्ययात्रेत आवर्जून हजर होते.

कामगार आयुक्त कार्यालयातर्फे चौकशी
कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी पी. बी. चव्हाण यांनी चौकशी केली. कारखान्यात एकूण कामगार किती, कायम किती, कंत्राटी कामगार कोण यांसह कामगारांसाठी उपयुक्त सोयी-सुविधांचा आढावा घेतला. त्यासोबतच कामगार प्रशिक्षित आहेत किंवा नाहीत, यासंदर्भात दोन तास चौकशी केली. तसेच त्यांनी सर्व महत्त्वाची कागदपत्रे तपासली.

आमदार सोनवणेंची घटनास्थळी भेट
चोपड्याचे शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज घटनास्थळी भेट दिली. विशन मिलवाणी हे पॉयोनिअर क्‍लबचे सदस्य असून, ‘स्पोर्टसमन’ असल्याने त्यांची व क्रीडापटू आमदार प्रा. सोनवणे यांची जुनी मैत्री असल्याने तसेच घटना गंभीर स्वरूपाची असल्याने भेट देत पाहणी केली.

दोन्ही कामगारांवर अंत्यसंस्कार
‘श्‍यामा फायर’ कारखान्यातील स्फोटात राजेंद्र तायडे आणि हेमंत जयस्वाल यांचा मृत्यू झाला होता. कामगारांनी दोघांचे मृतदेह घटनास्थळी आणला. ‘श्‍यामा फायर’च्या मालकाने दोघा मृतांना दीड लाख रुपये देण्याचे सांगितले. कामगारांनी जास्तीची मागणी केली; अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्यानंतर दुपारी तीनला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दोन्ही कामगारांवर दुपारी एकला अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
कारखान्यात दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्‍टरांनी माहिती दिल्यावरून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अहवाल तयार करण्यात येत असून, चौकशीअंती कारवाई होणार आहे.

Web Title: shyama fire work close