सिद्धार्थनगरला गट्टूरकडून पुन्हा महिलांचा छळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

गटऱ्याची दहशत 
- कृषीनगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर रात्री हप्तेवसुली 
- दहशतीने उचलून आणून रिकाम्या खोल्यांमध्ये मारहाण 
- पंचवटी, गंगापूर, दिंडोरी पोलिसांत लूटमारीचे 8-9 गुन्हे 
- बांधकाम मजुरांना मारहाण करत पैशाची लूट 
- परप्रांतीय महिलांचा भररस्त्यात विनयभंग 

नाशिक - बॉइज टाउन शाळेसमोरील सिद्धार्थनगरमधील सराईत गुंड सुनील नागू गायकवाड तथा गट्टूर ऊर्फ गटऱ्या याची पुन्हा दहशत सुरू झाली आहे. जुलै 2015 मध्ये सुरक्षारक्षकाला घरातून हुसकावून त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्यापर्यंतची दहशत करणाऱ्या गटऱ्याने तुरुंगातून सुटताच पुन्हा त्या भागात दहशतीचे प्रकार सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी भररस्त्यात महिलेला मिठी मारून त्या भागात प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्धार्थनगरला महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

सुरक्षारक्षकाला धमकावून घराबाहेर काढून त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्यासह इतरही अनेक गुन्हेगारी कारवायांतून कॉलेज रोडसह परिसरात गटऱ्याचा उपद्रव हा कॉलेज रोड जॉगिंग पार्क भागात दहशतीचा विषय झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास बॉइज टाउन शाळेसमोरील सिद्धार्थनगर भागात विवाहितेला भररस्त्यात गाठून मिठी मारून विनयभंग केला. महिलांच्या शौचालयाजवळ त्याने भररस्त्यात थाटलेल्या दारूच्या पार्टीसाठी संबंधित महिलेच्या पतीने पाणी दिले नाही, यावरून शिवीगाळ करत थेट पत्नीचा विनयभंग करण्याच्या या प्रकाराने पुन्हा एकदा सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. 

गुन्हेगारीचा पाढाच मोठा 
भररस्त्यात रात्री-अपरात्री लोकांना अडवून खंडणी वसुली, बेवारस खोल्यांत लोकांना आणून मारहाण करणे, रस्त्यावरील दारू, पाणी न देणाऱ्यांच्या घरात घुसून नवऱ्याला मारहाण करत त्यांच्या महिलांचे विनयभंग करण्यासारखे अनेक प्रकार करणाऱ्या गटऱ्याची दहशत पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी मुसक्‍या आवळल्यानंतर काहीसा थंड पडलेला गट्टूर व त्याच्या टोळीने पुन्हा सिद्धार्थनगर भागात दहशत चालविली आहे. काल संबंधित महिलेच्या तक्रारीवरून सुनील नागू गायकवाड ऊर्फ गटऱ्या याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांच्या कारवाया अद्याप थांबलेल्या नाहीत. 

उघड्यावर दारू पार्ट्या 
सिद्धार्थनगर झोपडपट्टीला लागून मोकळ्या बेवारस खोल्या आहेत. तो मद्यपींचा अड्डा बनला असून, तेथे तसेच महिलांच्या शौचालयासमोर उघड्यावर दारूच्या पार्ट्या करून महिलांना त्रास देतात. दोन वर्षांपासून गटऱ्याच्या दहशतीचे अनेक किस्से स्थानिकांकडून सांगितले जातात. जुलै 2015 मध्ये सुरक्षारक्षकाला दारू आणायला पाठवत त्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीवरील अतिप्रसंगाच्या प्रकारानंतर तत्कालीन उपायुक्त एन. अंबिका यांनी कारवाई केली. स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. पण आता तुरुंगातून सुटलेल्या गटऱ्याने पुन्हा एकदा दहशत सुरू केली. गटऱ्या व त्याच्या सहकारी गुंडांच्या दहशतीखालीच स्थानिक नागरिक विशेषतः महिलांचे जगणे अवघड झाले आहे. 

गटऱ्याची दहशत 
- कृषीनगर जॉगिंग ट्रॅक रस्त्यावर रात्री हप्तेवसुली 
- दहशतीने उचलून आणून रिकाम्या खोल्यांमध्ये मारहाण 
- पंचवटी, गंगापूर, दिंडोरी पोलिसांत लूटमारीचे 8-9 गुन्हे 
- बांधकाम मजुरांना मारहाण करत पैशाची लूट 
- परप्रांतीय महिलांचा भररस्त्यात विनयभंग 

Web Title: Siddhartha Nagar resists women again from Gatoor in Nashik