सिडकोत विक्रेत्यांचे रस्त्यांवरच अतिक्रमण

विलास पगार
मंगळवार, 27 जून 2017

वाहतूक कोंडीने नित्याचेच वाद; ग्राहक त्रस्त, प्रशासन सुस्त
सिडको - गेल्या काही वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्यामुळे; पण वाहनांची संख्या मात्र प्रचंड वाढल्यामुळे परिसरात विशेषतः भाजीबाजारांजवळ वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. दुचाकी पार्किंगवरून विक्रेते व ग्राहक यांच्यात हमरीतुमरीचे प्रकार वाढले आहेत. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे पोलिस, महापालिका व लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत असल्याने चौक भागात राहाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

वाहतूक कोंडीने नित्याचेच वाद; ग्राहक त्रस्त, प्रशासन सुस्त
सिडको - गेल्या काही वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्यामुळे; पण वाहनांची संख्या मात्र प्रचंड वाढल्यामुळे परिसरात विशेषतः भाजीबाजारांजवळ वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. दुचाकी पार्किंगवरून विक्रेते व ग्राहक यांच्यात हमरीतुमरीचे प्रकार वाढले आहेत. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे पोलिस, महापालिका व लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत असल्याने चौक भागात राहाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

सिडको व अंबडमध्ये जशी लोकसंख्या वाढत आहे तशी वाहनांचीदेखील संख्या वाढत आहे. आज परिसरातील एका कुटुंबात सरासरी दोन दुचाकी वाहने आहेत. मात्र, त्यामानाने रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. काही मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाढीव बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे रुंदीकरण कोण व कसे करणार, हासुद्धा प्रश्‍न आहे. सिडको प्रशासनाने बांधलेल्या नियोजनशून्य घरांमुळे आता काही लहान रस्त्यांमधून चारचाकी वाहन जाणे कठीण झालेले आहे. भविष्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे होते, पण तसे न झाल्यामुळे या भागातील काही रस्त्यांमध्ये सध्या सायंकाळी दुचाकीवरून जाणे सूज्ञ नागरिक टाळू लागले आहेत. दाट लोकवस्तीचा हा परिसर असल्यामुळे सायंकाळी येथील भाजीबाजारांमध्ये मोठी गर्दी होते. पण बाजार परिसरात वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे चौकातील रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच वाहन पार्किंगजवळच अनेकांची दुकाने आहेत, त्यामुळे ते वाहने लावू देत नाहीत. परिणामी, ग्राहक व विक्रेते यांच्यात नित्याचे वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत.

महापालिका रस्त्यावर विक्रेत्यांना कसे बसू देते, हासुद्धा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. बाजारात गाळे असताना काही विक्रेते सर्रास रस्त्यावरच दुकाने थाटतात. त्यांच्याकडून महापालिकेचे कर्मचारी कर वसूल करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पण त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कुणी लक्षात घेत नाही. त्रिमूर्ती चौक, पवननगर, शिवाजी चौक येथे तीन मुख्य बाजार या परिसरात भरतात. त्यापैकी त्रिमूर्ती चौकातील रस्ता मोठा पण प्रचंड वर्दळीचा आहे. रस्ता मोठा असला तरी येथे मोठ्या प्रमाणावर विविध खाद्यपदार्थ, तसेच भाजीपाला विक्री करणारे रस्त्यावरच दुकाने थाटतात. त्यात ग्राहकांची वाहनेही रस्त्यातच लावली जातात. त्यामुळे सायंकाळी वाहतूक कोंडीत भर पडते. पवननगर येथील बाजाराजवळचा चौक रुंद असल्यामुळे येथून मोठी वाहने घेऊन जाणे सायंकाळी मुश्‍किल झालेले आहे. शिवाजी चौकातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या तीनही बाजारांजवळ वाहनांना शिस्त लावणे गरजेचे झालेले आहे. महापालिकेने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, तर वाहतूक पोलिसांनी कुठेही पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली तर ही समस्या सहज सुटू शकते.

सिडको परिसरात वाहनांची संख्या वाढली आहे. पण त्यासाठी लागणारे नियोजन प्रशासनाने केलेले नाही. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या भागातील काही रस्ते ‘वन वे’ केल्यास, तसेच मुख्य बाजार भागात वाहनतळांची निर्मिती केल्यास हा प्रश्‍न सुटू शकेल.
- गोरक्षनाथ कासार

पवननगर परिसरात वाढलेल्या रहदारीमुळे बरेच नागरिक या रस्त्यात वाहतूक कोंडी होते म्हणून जाण्यास टाळतात, असे सध्या दिसून येत आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची गरज आहे.
- गोकुळ माळी

Web Title: sidko nashik news Encroachment on the streets of sidko