संदीप फाउंडेशनमध्ये आजपासून चार दिवस ‘शिक्षणाची वारी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तयार केलेल्या पन्नास प्रकल्पांचे स्टॉल या वारीत सहभागी असून, यातून शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण ज्ञानाची भर पडणार आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक विभाग यांच्यातर्फे ही ‘शिक्षणाची वारी’ होत आहे.

सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तयार केलेल्या पन्नास प्रकल्पांचे स्टॉल या वारीत सहभागी असून, यातून शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण ज्ञानाची भर पडणार आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक विभाग यांच्यातर्फे ही ‘शिक्षणाची वारी’ होत आहे.

अध्ययन व अध्यापन पद्धतीत नवे बदल शाळा व शिक्षकांपर्यंत पोचले पाहिजेत म्हणून सुरू झालेल्या विविधांगी उपक्रमात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘शिक्षणाची वारी’ ही राज्याच्या विविध भागांत झाली. आता नाशिकमध्ये ही वारी होत असून, त्यातून गणित व भाषावाचन विकास, कृतियुक्त अध्यापन, बदलती पाठ्यपुस्तके व भूमिका याची माहिती शिक्षकांना व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. आतापर्यंत लातूर, अमरावती व रत्नागिरी या विभागांत वारी झाली.

नाशिक येथील शिक्षणाच्या वारीत मुंबई, पुणे व नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांतील शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यात ५० शिक्षकांचे स्टॉल, तसेच इतर तीन स्टॉल शासनाच्या पुस्तकांचे लागणार आहेत. दररोज विविध तीन जिल्ह्यांतील २०० प्राथमिक, ५० माध्यमिक, ५० शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, असे नऊशे शिक्षक व शिक्षणप्रेमी भेट देणार आहेत. दुपारी दोननंतर शिक्षणप्रेमी व इतर शिक्षकांना ही वारी खुली आहे.

चार दिवसांत हजारो शिक्षक वारीला भेट देतील. दिव्याने दिवा पेटवून उद्या (ता. २९) सकाळी साडेनऊला वारीचा प्रारंभ होईल. त्यानंतर चार दिवस (ता. १ फेब्रुवारीपर्यंत) हा ज्ञानयज्ञ तेवत ठेवला जाईल. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, बालभारती, तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार प्रमुख पाहुणे असतील. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षण विभागाचे पिराजी पाटील, अंकुश बोबडे, श्री. वाडेकर, सर्व संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, संदीप फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील, सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, प्राचार्य, विषय सहाय्यक, अधिव्याख्याता व विस्तार अधिकारी प्रयत्नशील आहेत.

मूल्यवर्धन, क्रीडा, स्वच्छता, कला व कार्यानुभव, किशोरवयीन आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, कृतियुक्त विज्ञान, दिव्यांग मुले व मुलींचे शिक्षण, तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, या व इतर विषयांवरील प्रकल्पांचा खजिना या शिक्षणाच्या वारीत आहे. त्यातून गुणवत्तावाढ व १०० टक्के शाळांचा विकास, हे ध्येय ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण होईल व शिक्षकांचा आत्मविश्‍वास या ‘शिक्षणाच्या वारी’तून वाढेल.
- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

शिक्षणाची वारी हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन प्रकल्पांची व बदलाची माहिती ग्रामीण भागातील सर्वांपर्यंत पोचावी, या उद्देशाने होत आहे. १७० शब्दांपासून ५० लाख इंग्रजी वाक्‍ये तयार करणे, अभिजात भाषा, शाळासिद्धी, कौशल्य विकास, लोकसहभागातून शाळासमृद्धी, मित्रा ॲप, या व इतर विषयांवरील प्रकल्प शिक्षकांना दिशा देणारे आहेत.
- रवींद्र जावळे, प्रभारी उपसंचालक व प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidko news shikshanachi wari by sandeep foundation