सिग्नलवरील भिकाऱ्यांकडून सिनेस्टाइल हप्तावसुली

नरेश हाळणोर
बुधवार, 9 मे 2018

नाशिक - ‘ट्रॅफिक सिग्नल’ हिंदी चित्रपटाप्रमाणे शहरातील सिग्नलवर भीक मागणाऱ्यांकडून हप्तावसुली करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांनी शहरातील काही सिग्नलवरून त्यांना पोलिस मुख्यालयात आणले. मात्र, भिकाऱ्यांना सोडविण्यासाठी काही संशयितांचा आटापिटा दिसला. पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली, पण संशयित पसार झाले. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. 

पंधरा-वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ चित्रपटात भिकारी-फेरीवाल्यांकडून कशाप्रकारे हप्तावसुली करतात, याचे वास्तव मांडण्यात आले होते. नाशिकमध्ये अगदी त्याच सिनेस्टाइलने ही वसुली सुरू असल्याचे जाणवले. 

त्र्यंबकेश्‍वर नाका, गडकरी चौक, शरणपूर पोलिस चौकी सिग्नल, सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नलजवळ लहान मुले घेऊन भिक्षा मागणाऱ्या महिला, लहान मुलांकडून म्हाडा कॉलनीतील तिघांकडून रोज रात्री हप्ता घेतला जात होता. भिकारी परजिल्ह्यांतून, तर काही परराज्यांतील आहेत.

दमदाटीने पैसे हिसकावण्याचा प्रकार
मुंबई नाका सर्कलजवळील उड्डाणपुलाखाली असलेले काही जण फुलांचे गजरे विकतात. काही जण भीक मागायचे आणि त्याच जागेवर झोपायचे. त्यांच्याकडूनही तीन संशयित हप्तावसुली करीत होते. हप्तावसुली करणारे भिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडील पैसे हिसकावून न्यायचे, अशीही माहिती काही भिकाऱ्यांनी पोलिसांना दिली.

मुख्यालयातही फिरकला
पोलिसांनी म्हाडा कॉलनीतील दोघांच्या घरावर पाळतही ठेवली आहे. यातील एकजण भिकाऱ्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिस मुख्यालयातही आला होता, पण भिकाऱ्यांच्या सुटण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने त्याने काढता पाय घेतला. तो गेल्यानंतर काही भिकाऱ्यांनी पोलिसांना ही बाब सांगितली होती. 

भिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांच्या मागावर पोलिसांचे पथक आहे. आज ना उद्या त्यांना जेरबंद केले जाईल. विशेषत: सिग्नलवरील भिकाऱ्यांकडून टोळी हप्तावसुली करायची, अशी माहिती आहे. 
- अशोक नखाते, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: signal begger installment recovery crime