फलोत्पादन महापरिषदेला महिलांची संख्या लक्षणीय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

नाशिक - राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेला महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय ठरली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांतून गटागटाने आलेल्या जवळपास सर्वच महिलांनी आधुनिक शेतीची कास धरण्याचा मानस व्यक्त केला.

नाशिक - राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेला महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय ठरली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांतून गटागटाने आलेल्या जवळपास सर्वच महिलांनी आधुनिक शेतीची कास धरण्याचा मानस व्यक्त केला.

शेती फक्त पुरुष मंडळी कसत नाहीत तर त्यात महिलांचाही तितकाच सहभाग आहे. चूल आणि मूल सांभाळत त्यांना शेतात राबावे लागते. ग्रामीण भागात असे चित्र असतानाही महिलांनी आपली शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या महापरिषदेला हजेरी लावली. घरचे काम सांभाळून परिषदेला आलेल्या या महिलांनी निर्यातक्षम उत्पादन घेण्याची इच्छा व्यक्त केली. शेती सर्वच जण करतात; परंतु तयार झालेला माल योग्य त्या ग्राहकापर्यंत पोचविणे हेच मुळात जिकिरीचे असते. त्यासाठी योग्य ती साखळी निर्माण करणे गरजेचे आहे. आपण घेत असलेले उत्पादन निर्यातक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी या परिषदेचा फायदा झाल्याचे नाशिकलगतच्या शिंदे गावातल्या महिला सरपंच माधुरी तुंगार यांनी सांगितले.

भारतातले वातावरण अनेक पिके घेण्यायोग्य आहे. अनेक फळ आणि भाज्या इथेच तयार झाल्या तर आयातीपेक्षा निर्यात वाढविता येईल. यातून देशाच्या परकीय गंगाजळीत तर भर पडेलच; परंतु शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील, असे नारायणगाव (जि. पुणे) येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा प्रियंका जुन्नरकर यांनी सांगितले.

गावागावांत तंत्रज्ञान पोचविण्यासाठी अशा परिषदा होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत सिन्नरच्या शिंदे गावच्या चित्रा बोराडे यांनी सांगितले, की कमी खर्चात जास्त उत्पादन प्रत्येकाला हवे आहे. परंतु, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी. कोल्हापूरच्या कागल तालुक्‍यातील सोनाळे गावातून आलेल्या वैशाली धनावडे यांनी कोल्हापूरसारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यात या महापरिषदेनंतर द्राक्ष पिकविण्याचा मानस व्यक्त केला. केळी, टॉमेटो, गवार आदी पिकांच्या नव्या जातींची त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली.

Web Title: A significant number of women in horticulture mahaparisadela