मालेगावच्या व्यापाऱ्यास भर दुपारी लुटले सहा जणांनी

भगवान जगदाळे
शनिवार, 7 एप्रिल 2018

५५ हजाराचा मुद्देमाल लंपास, एकास सिनेस्टाईल अटक, पाच आरोपी फरार..

५५ हजाराचा मुद्देमाल लंपास, एकास सिनेस्टाईल अटक, पाच आरोपी फरार..

निजामपूर-जैताणे (धुळे): सुझलॉन कंपनीचे व्यवस्थापक व कर्मचारी असल्याचे भासवून तांब्याची तार (कॉपर वायर) विक्रीच्या बहाण्याने शुक्रवारी (ता. ६) दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास मालेगाव येथील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास सहा जणांनी टिटाणे गावालगत सुझलॉन कंपनीच्या कार्यालयाजवळ बोलावून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण करत पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्ससह सोन्याची चैन, अंगठी, कानातील बाळ्या व ऍपल कंपनीचा महागडा मोबाईल असा एकूण ५५ हजाराचा मुद्देमाल जामदे (ता.साक्री) येथील मोटारसायकलवरुन आलेल्या सहा संशयितांनी लुटून नेला.

दरम्यान, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर पोलिस कर्मचाऱ्यांसह त्याच मार्गाने शासकीय वाहनाने गस्तीवर जात असल्याचे फिर्यादीला दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून पीडितांची विचारपूस केली. फिर्यादीने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. तेवढ्यात लूटमार करणाऱ्या सहा आरोपींपैकी दोन आरोपी तिकडूनच मोटारसायकलने जाताना दिसले. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा थेट पांगण गावापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला. गावकऱ्यांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती नसल्याने त्यांनी दोन्ही आरोपींना तात्पुरता आश्रय देत प्यायला पाणी वगैरे देणार तेवढ्यात एपीआय दिलीप खेडकर यांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला.

त्यानंतर मालेगाव येथील तरुण व्यापारी गौरव संजय येवले (वय-२२) ह्याने त्याचा मित्र अशोक उभाळे याच्यासह मोटारसायकलीने निजामपूर पोलिस ठाणे गाठले. फिर्यादी गौरव येवले याने दिलेल्या फिर्यादीनुसार वसंत पवार, जॉन संतोष भोसले, प्रदीप मॅनेजर चव्हाण, जॉनी संतोष भोसले, बालम अशोक भोसले, अजय चतुर पवार सर्व रा. जामदे (ता.साक्री) या २५ ते ३० वयोगटातील सहा संशयितांविरुद्ध मारहाणीचा, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व दरोड्याचा गुन्हा रात्री नऊच्या सुमारास दाखल केला. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अन्य एका व्यापाऱ्याला लुटल्याची कबुलीही अटकेत असलेल्या मुख्य आरोपी वसंत पवार ह्याने दिली आहे. दरम्यान, पोलिसांबद्दल एक चांगला अनुभव आल्याची प्रतिक्रिया फिर्यादी गौरव येवले ह्याने 'सकाळ'शी बोलताना दिली. रात्री पुन्हा उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथक जामदेकडे रवाना झाले.

Web Title: six people robbed the trader of Malegaon