सहावा संशयितही अखेर जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

साक्री - उंभर्टी (ता. साक्री) येथील जंगल शिवारात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील बेपत्ता सहावा आरोपी किशोर दशरथ अहिरे (वय 26, रा. तुंगेल ता. बागलाण, जि. नाशिक) याला साक्री पोलिसांनी आज अटक केली. त्याला उद्या (ता. 12) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.

साक्री - उंभर्टी (ता. साक्री) येथील जंगल शिवारात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील बेपत्ता सहावा आरोपी किशोर दशरथ अहिरे (वय 26, रा. तुंगेल ता. बागलाण, जि. नाशिक) याला साक्री पोलिसांनी आज अटक केली. त्याला उद्या (ता. 12) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.

उंभर्टी येथील जंगल शिवारात 22 फेब्रुवारीला शेवडीपाडा (ता. साक्री) येथील 22 वर्षीय आदिवासी तरुणीवर उंभर्टी शिवारात विहिरीचे खोदकाम करणाऱ्या सहा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असताना "सकाळ'ने 26 फेब्रुवारीला त्यास वाचा फोडून प्रकरण सर्वांसमोर आणले होते. यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी या तरुणीस धुळे येथे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दावल जीवन सोनवणे, रावण जीवन सोनवणे (दोघेही रा. तुंगेल, ता. बागलाण), शशी विठ्ठल पवार (रा. गव्हाणीपाडा) व प्रल्हाद दादाजी गायकवाड (रा. राजूरपाडा) या चार आरोपींना त्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोनच दिवसांत पाचवा फरार आरोपी रावसाहेब ऊर्फ दादू गोरख भदाणे (रा. उंभर्टी) याला ताब्यात घेतले होते. या पाचही आरोपींना 22 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

सहावा संशयित जेरबंद
पोलिसांनी सापळा लावून आज या प्रकरणातील सहावा फरार आरोपी किशोर अहिरे याला तुंगेल या त्याच्या गावातून अटक केली. होळी सणाच्या निमित्ताने तो गावी येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलिसांकडून तो येण्याची शक्‍यता असलेल्या दोन- तीन ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. त्यात पोलिसांना यश आले, त्याला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली. या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. "सकाळ'ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर साक्री तसेच पिंपळनेर पोलिस, विशेषतः या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अतिशय वेगाने तपास केला. सहाही आरोपींना ताब्यात घेत पीडित तरुणीस न्याय मिळवून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले.

Web Title: sixth suspected arrested in rape case