द्राक्षपंढरीला आस ‘स्मार्टसिटी’ची

महेंद्र महाजन 
बुधवार, 17 मे 2017

मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते. अष्टप्रहर पद्धतअंतर्गत कोणतीही समिती स्थापन करावयाची झाल्यास सर्व धर्मांना प्रतिनिधित्व दिले जाते. शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भतेचे दर्शन घडते. लग्नामधील वरात, फेटे, दशक्रिया विधीवेळी टॉवेल-टोपी यावरच्या खर्चाला फुली मारण्यात आली.

मखमलाबाद म्हणताच पेरूचं गाव डोळ्यासमोर उभं राहायचं. मराठा, आदिवासी, वंजारी, माळी, दलित, मुस्लिम, सोनार, पांचाळ आदी समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या गावठाणाचा मुख्य व्यवसाय शेती. याच गावातील बहादूर अन्‌ प्रयोगशील शेतकऱ्यांनी गावाला द्राक्षपंढरी अशी ओळख दिली. भाजीपाल्यासह गव्हाचे उत्पादन घेतले जाते. अष्टप्रहर पद्धतअंतर्गत कोणतीही समिती स्थापन करावयाची झाल्यास सर्व धर्मांना प्रतिनिधित्व दिले जाते. शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भतेचे दर्शन घडते. लग्नामधील वरात, फेटे, दशक्रिया विधीवेळी टॉवेल-टोपी यावरच्या खर्चाला फुली मारण्यात आली. रामचंद्र काकड या निवृत्त शिक्षकाने ग्रंथालयाची चळवळ बळकट केली. ग्रंथालयभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. शहराच्या विस्तारीकरणात गावाने भरारी मारली असून, शेतकरीबहुल भागाला ‘स्मार्टसिटी’ची आस लागलीय. शहरीकरणाचा मुखवटा परिधान करण्यासाठी स्थानिकांच्या अद्याप विकासासंबंधीच्या अपेक्षा कायम आहेत. त्याविषयी... 

शिवारात १८ हजार एकरपर्यंतचे क्षेत्र असून, पाच हजार एकरचे ‘लेआऊट’ झाले. आठ हजार एकर ‘यलो झोन’मध्ये समाविष्ट असले, तरीही बऱ्याच क्षेत्रावर शेती केली जाते. प्रत्यक्षात उरलीय सहा हजार एकर शेती. शेतीचा भाव एक कोटीपासून आठ कोटी रुपये एकरपर्यंत पोचलाय. या भागाला आळंदी, गंगापूर कालव्याचे आता जसे पाणी मिळते तसे पाणी मिळत राहिल्यास शेतकरी ‘लेआउट’ करण्याऐवजी शेती करण्यास प्राधान्य देत राहतील, असे शेतकरी आवर्जून सांगतात. सद्यःस्थितीत गावठाणातील लोकसंख्या १२ हजार आहे.

महापालिकेत समावेश झाल्यानंतर ४० रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरणाची कामे झाली आहेत. मात्र, अद्याप मखमलाबाद-मातोरी शिवरस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. गोपाळवाडी, जांभोळ, सुळेवाडी, देवीमंदिर रस्त्याचे अस्तरीकरण होणे बाकी आहे. ५० टक्के वाहतूक होत असलेल्या सुयोजित गार्डन ते छत्रपती शिवाजी विद्यालय या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण स्थानिकांना अपेक्षित आहे. पंचवटी विभागीय कार्यालय ते मखमलाबाद गाव रस्ता चारपदरी व्हावा, असेही मखमलाबादकरांना वाटते.

स्वच्छतेचाही आग्रह कायम
मखमलाबादच्या पन्नास किलोमीटर परिघात गावठाणासाठी चार आणि प्रभागासाठी चार, असे स्वच्छता कर्मचारी आहेत. नागरी वस्तीचा विस्तार आणि स्वच्छता याच्याशी मनुष्यबळाचे समीकरण जुळत नाही. त्यामुळे किमान पन्नास जणांची व्यवस्था महापालिकेने स्वच्छतेसाठी करावी, असे नागरिकांना वाटते. त्याचप्रमाणे घंटागाडी नियमित करण्यासह आणखी एक घंटागाडी वाढून मिळावी, अशीही अपेक्षा आहे. राघोजी भांगरेनगर तथा कोळीवाडा या अडीचशे कुटुंबांच्या वस्तीत सुलभ शौचालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. या भागात वीजखांबांना घेरून घरांचा विस्तार करण्यात आल्याने अतिक्रमणाचा प्रश्‍न डोळ्याआड होत नाही. या वस्तीत गटारी उघड्या असून, त्यावरील ढापे बऱ्याच भागात अस्तित्वात नाहीत. त्यामुळे गटारी भुयारी कराव्यात. रस्त्याचे डांबरीकरणही व्हावे, अशीही मागणी आहे. 

मखमलाबादकरांना आणखी हवंय
प्राथमिकपासून ते महाविद्यालयापर्यंत दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेताहेत. मराठा हायस्कूलजवळ एक कोटी १० लाख रुपये खर्चाची महापालिकेच्या शाळा क्रमांक ८६, ८७ या डिजिटल स्कूलची इमारत उभारली जात आहे. ही इमारत अंतिम टप्प्यात आहे. मात्र, शाळा क्रमांक १०३ साठी इमारतीची प्रतीक्षा संपलेली नाही. दिव्यांगांच्या दोन शाळा, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पाच खासगी शाळा, उन्नती विद्यालय, ‘मविप्र’चे माध्यमिक ते महाविद्यालय वर्ग, अशी शिक्षणाची व्यवस्था आहे. महाविद्यालयीन शिक्षणाची विज्ञानाची शाखा सुरू व्हावी, अशी मखमलाबादकरांची अपेक्षा आहे. याशिवाय तवलीच्या डोंगराजवळ एक कोटी २० लाखांची क्रीडा प्रबोधिनी प्रस्तावित करण्यात आली आहे. तरणतलाव, ग्रीन जिमचा त्यात समावेश आहे. ही क्रीडा प्रबोधिनी मार्गी लागावी, असा आग्रह स्थानिकांचा आहे. 

गंगापूर कालव्यालगत जुन्या पंपिंगच्या जागेत साडेसात कोटींचा जलकुंभ मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन होणे बाकी आहे. या जलकुंभाचे काम पूर्णत्वास जाण्याने कमी दाबाचा प्रश्‍न काहीअंशी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय १९९७ मध्ये टाकलेल्या ४ इंच व्यासाच्या जलवाहिन्या अपुऱ्या पडू लागल्याने ८ आणि १२ इंची व्यासाच्या जलवाहिन्यांचे काम वेगाने व्हायला हवे, अशी मागणी आवर्जून पुढे आली.

आठवड्यातून दोन फिरता दवाखाना या भागात येतो. मात्र, स्थानिक गरीब रहिवाशांच्या आरोग्यसेवेतील खर्चात कपात होण्यासाठी कायमस्वरूपी आरोग्य केंद्र स्थानिकांना हवे. त्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली.

म्हाडातर्फे ३५० सदनिकांचे संकुल उभारले आहे. मात्र, याठिकाणची एकही सदनिका विकली गेली नाही. या सदनिका विकल्या जाव्यात म्हणून म्हाडातर्फे विशेष प्रयत्न होण्याची गरज स्थानिकांना वाटते. इथे कुटुंबांचा वावर वाढल्याने अर्थकारणाला चालना मिळण्यास मदत होईल.

मखमलाबादकरांना सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न भेडसावतोय. या भागात एसटी बसची सुविधा अपुरी असल्याने खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. शहरात आनंदवली, गंगापूरखालोखाल या भागात वस्ती वाढते आहे. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण नागरिकांना महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर बसथांब्याशेजारी संरक्षक भिंत उभारल्यास दहा फूट जागा उपलब्ध होते. यासह इतर जागेवर व्यापारी संकुल उभारले जावे, अशीही मागणी आहे.

दारू, मटक्‍याचा बंदोबस्त आवश्‍यक
महामार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मोठे स्वागत करण्यात आले. दारूमुळे गावात होणारे वाद नियंत्रणात येण्यास मदत झाली, हे त्यामागील कारण. पण म्हणून दारूच्या काळाबाजारासह मटका थांबलेला नाही. मोटारसायकल, रिक्षामधून खोकी आणून चोरून-लपून ४५ रुपयांची देशी दारूची बाटली ८० रुपयांना विकली जाते. लपून-छपून मटका घेतला जातो. बेकायदेशीर धंद्यांची माहिती मिळताच स्थानिकांकडून असा धंदा करणाऱ्यांचा बंदोबस्त होतो. मात्र, त्यातून प्रश्‍न कायमस्वरूपी सुटलेला नाही. त्यामुळे दारूसह मटक्‍याचा बंदोबस्त व्हायला हवा, असा आग्रह धरण्यात येत आहे.

दोन एकरांवर हवा कुस्त्यांचा फड
पावसाळ्यात नागपंचमीला भरणारा यात्रोत्सव, हे मखमलाबादचे सांस्कृतिक वैभव. यात्रोत्सवात २५ ते ३० हजार भाविक सहभागी होतात. यात्रोत्सवात भरणारा कुस्त्यांचा फड हेही एक वैशिष्ट्य. इथल्या कुस्त्यांच्या परंपरेला भरभराट आणण्यासाठी दोन एकरवर कुस्त्यांचा फड विकसित व्हावा, अशी मागणी पुढे आली. आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून एक कोटी १० लाखांचा प्रकल्प पर्यटनाच्या अनुषंगाने विकसित झाल्याची माहिती माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनी दिली. शांतीनगरमधील स्वामी समर्थ केंद्र भागात १० लाखांच्या सभामंडपाचे काम सुरू असून, पर्यटनामधून भोजन कक्ष, गाभारा अशा कामांसाठी ९० लाखांचा निधी श्री. सानप यांच्या माध्यमातून मंजूर झाला. स्मशानभूमीतील मधल्या भागात तीन डोमचे काम मंजूर आहे. ही कामे व्हायला हवीत, असाही आग्रह आहे.

मळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावत असतानाच गावठाणातील कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्याची समस्या सोडवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तवलीच्या डोंगराजवळ आणि शांतीनगरमध्ये जलकुंभ उभारण्याची गरज आहे. त्याच वेळी तरणतलाव उभारत जलतरणपटू तयार करणे शक्‍य आहे. या भागात ४०० ले-आउट आहेत. त्यातील पाच ठिकाणी मंदिर, कपाउंडची व्यवस्था झाली आहे. 
- पुंडलिक खोडे, नगरसेवक

महापालिकेच्या विद्युत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कॉलनी, मळे परिसर अंधारात असतो. हायड्रॉलिक वाहन आठवड्यातून एकदा मिळते. त्यात सुटी आल्यास आनंदीआनंद असतो. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. पावसाळा येत असल्याने पथदीप सुस्थितीत राहतील, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
- ज्ञानेश्‍वर पिंगळे, भाजपचे ज्येष्ठ नेते

प्लास्टिकमुक्त प्रभाग ही चळवळ उभारण्याची गरज आहे. दुधाला जाताना भांडे न्यावे. किराणा दुकान, भाजीपाला अशा ठिकाणी पिशवी न्यावी. याचा आग्रह स्थानिक पातळीवर धरावा लागेल. प्रदूषणासह शेतीच्या सत्यानाशास कारणीभूत करणाऱ्या प्लास्टिकला आता हद्दपार करावे लागेल. १९८४ मध्ये (स्व.) हरिभाऊ महाले यांच्या विकासनिधीतून उभारलेली शाहू महाराज व्यायामशाळेची दुरवस्था झाली आहे. 
- दामोदर मानकर, माजी नगरसेवक

इरिगेशन कॉलनीसमोरील स्वामी विवेकानंदनगरमध्ये भुयारी गटारीचे काम व्हायला हवे. आमच्या भागात घंटागाडी बऱ्याचदा थांबत नाही. त्यामुळे घरामध्ये कचरा साठवावा लागतो. चार ते पाच दिवसांनी घंटागाडी येते. हाही प्रश्‍न सुटावा, असे वाटते.
- गोरख सांगळे, स्थानिक रहिवासी

गामणे मळा परिसर, इंद्रप्रस्थनगर, इरिगेशन कॉलनीच्या मागील 
बाजूने रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम व्हावे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सुटून सुरळीत पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
- संजय गामणे, स्थानिक रहिवासी

उद्याने विकासाची कामे पावसाळ्याचा विचार करून सुरू करायला हवीत. रात्री वीज गायब होत असल्याने डासांचा त्रास होतो. त्यामुळे आमचा भाग शहरात समाविष्ट असल्याने रात्री वीज गायब होऊ नये.
- प्रा. चंद्रकांत खैरनार, स्थानिक रहिवासी

Web Title: smart city axis to nashik