स्मार्टसिटी म्हणजे सृजनशील, संस्कारक्षम शहर

प्रा. डॉ. स्नेहल सोनवणे
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

कोणत्याही गोष्टीचा कळस रचण्याआधी पाया भक्कम घडविला गेला पाहिजे. बाल्ल्यावस्थेत मूल्याधिष्ठित विचारांची भक्कम पायाभरणी झाली, की युवावस्थेत ती संक्रमित होणे फारसे अवघड नसते.

कोणत्याही गोष्टीचा कळस रचण्याआधी पाया भक्कम घडविला गेला पाहिजे. बाल्ल्यावस्थेत मूल्याधिष्ठित विचारांची भक्कम पायाभरणी झाली, की युवावस्थेत ती संक्रमित होणे फारसे अवघड नसते.

प्रत्येक नागरिकाला हे शहर माझे आहे, असे जेव्हा वाटेल तेव्हा शहर स्मार्ट होणे कठीण नाही. प्रत्येकाला असे वाटले, की मग नियमांचा, कायद्यांचा जाच वाटणार नाही. हे सर्व आपल्यासाठीच आहे, हे आपलेपणच फार मोठं काम करून जाते. स्मार्ट म्हणजे केवळ दिखाऊपणा नको. तो दृश्‍यस्वरूपात असावा, पण त्याहीपेक्षा तो प्रत्येक व्यक्तीच्या मनोधारणेत असला पाहिजे. प्रत्येकाने कर्तव्याचा आधी विचार करावा, त्यात उपकाराची भावना नको. उलट यामागे माझे, समाजाचे, शहराचे हितच आहे, ही उदात्त भावना असावी म्हणून कुटुंबातील बालपणाचे संस्कार महत्त्वाचे आहेत. जीवनाची नीतिमूल्ये कुटुंबात रुजतात; ती मनात घर करून राहतात.

आपल्या शहराची नीट ओळख असली पाहिजे. यासाठी घरातले वातावरण, प्राथमिक-माध्यमिक अभ्यासक्रमात स्थानिक इतिहासाचा समावेश असला पाहिजे. म्हणजे माझे शहर पूर्वी काय होते? आज काय आहे? आणि उद्या कसे असेल?, हे समजेल आणि आता मी नाशिककर म्हणून माझी जबाबदारी काय आहे, यासाठीचा अभिमान निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व गोष्टींसाठी शहराची युवाशक्ती हा मोठा ऊर्जास्रोत आहे. या ऊर्जेचा विधायक आणि निर्मितीक्षमतेचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, कमवा आणि शिका, एनसीसी, नेव्हल, विद्यार्थिनी मंच, महिला सबलीकरण मंच यांसारख्या सेवा सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत असतातच या प्रयत्नांना स्थानिक स्वराज्य संस्थांचाही पाठिंबा असतो, त्यांचा सहभागही असतो. याही पलीकडे जाऊन स्मार्टसिटीकडे जाण्यासाठी युवाशक्तीची एक सशक्त पार्श्‍वभूमी तयार होणे आवश्‍यक आहे. कौशल्याधिष्ठित, तसेच स्वयंरोजगार निर्मितीसाठी स्मार्टसिटी या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक जोमाने पावले टाकण्याची गरज आहे.

आज वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी यामधून आमच्याच शहराला विद्रूप करणाऱ्या विध्वंसक गोष्टी आपण वाचतो, पाहतो, तेव्हा संवेदनशीलताच कोठे तरी हरवत चालली, लोप पावत चालली, अशी भीती वाटते. मग ही संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी नेमके नाशिककरांचे प्रयत्न कमी कुठे पडतात?, या प्रश्‍नाचे उत्तर स्मार्टसिटीच्या प्रयत्नांतून आपल्याला मिळविता आले पाहिजे. मला असे वाटते, सर्वांच्या सृजनशीलतेतून उत्तर मिळू शकेल. आमची मानसिकता शहर उपयोगी असण्याचा स्मार्टनेस नागरिकांमध्ये असावा, पण त्याचबरोबर योजना राबविणाऱ्या शासकीय यंत्रणेनेही स्वार्थ बाजूला ठेवून योजना सक्षमतेने राबविण्यास स्मार्टनेस आणला पाहिजे. आपल्या शहराचे स्थानिक स्रोत-संसाधने काय आहेत, हे ओळखून ते पुढे आणून विकासाची गंगा पुढे पुढे नेली पाहिजे.

वैचारिक पाया भक्कम असेल, तरच अपेक्षित बदल घडून येऊ शकतात. आपल्यासमोर जे समाजासाठी, शहराच्या प्रगतीसाठी चांगले असेल त्या गोष्टींमध्ये नव्या प्रगत विचारांची भर टाकून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून पुढे नेले पाहिजे. म्हणूनच आपण काळाचे संकेत ओळखून आपल्या शहराचा सुंदर, नवीन इतिहास स्मार्टसिटीकडे नेण्याचा संकल्प करू या! 

Web Title: Smart City is creative, cultured city