"स्मार्टसिटी'चे शिवधनुष्य पेलणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

नाशिक - शहरासाठी महापालिकेने तयार केलेल्या स्मार्टसिटी प्रस्तावात रेट्रोफिटिंग अर्थात, गावठाण भागाचा विकास करणे अवघड काम आहे. पण अवघड असले, तरी आम्ही ते शिवधुनष्य पेलणारच. मुंबईत यापूर्वी जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गावठाणाचा विकास करणे शक्‍य असल्याचा विश्‍वास स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिला. 

नाशिक - शहरासाठी महापालिकेने तयार केलेल्या स्मार्टसिटी प्रस्तावात रेट्रोफिटिंग अर्थात, गावठाण भागाचा विकास करणे अवघड काम आहे. पण अवघड असले, तरी आम्ही ते शिवधुनष्य पेलणारच. मुंबईत यापूर्वी जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर गावठाणाचा विकास करणे शक्‍य असल्याचा विश्‍वास स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिला. 

केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाल्यानंतर आज महापालिकेत नाशिक स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीची पहिली बैठक झाली. या वेळी संचालक महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर गुरुमित बग्गा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या वेळी माध्यमांशी बोलताना श्री. कुंटे म्हणाले, की गावठाणाचा विकास करताना वीजतारा भूमिगत करणे, जलवाहिनी बदलणे व अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम अवघड आहे. मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे काम अवघड आहे, पण ते शक्‍य आहे. अधिकारी म्हणून आव्हानात्मक कामे स्वीकारणे आमची जबाबदारी आहे.
 

मुंबई रोल मॉडेल ठेवून विकास
श्री. कुंटे म्हणाले, की मुंबईत गावठाण विकासातही नाशिकप्रमाणेच अडचणी होत्या. पण ते काम योग्य नियोजनातून साध्य झाले आहे. स्मार्टसिटी संकल्पनेतच नव्या योजना आणून शहरांना नवा आयाम देण्याचा उद्देश आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करता येईल का, याचा प्रामुख्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आज झालेल्या बैठकीमध्ये कंपनीच्या संचालकांनी स्मार्टसिटीचा आराखडा समजून घेतला. आताची परिस्थिती व स्मार्टसिटी साकारल्यानंतर नावारूपास येणाऱ्या प्रकल्पांची पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती जाणून घेतली. प्रकल्पांसाठी येणारा खर्च, निधीची उभारणी, जागा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

स्मार्टसिटी प्रकल्प साकारण्यासाठी आम्ही सकारात्मक दृष्टीने काम करू. कंपनीची नाळ महापालिकेशी जुळलेली आहे त्यामुळे कोणाच्या अधिकारांवर गदा येणार नाही. स्मार्टसिटीचे जे काही काम होईल ते नागरिक, महापालिका व कंपनी मिळून होईल.
- सीताराम कुंटे, अध्यक्ष, एसपीव्ही कंपनी 

Web Title: "Smart City's bow cope Shiva