सहकार्यातूनच साकाराले "स्मार्ट धुळे' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील धुळे...' या विषयावरील परिसंवादात उमटला. 

धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील धुळे...' या विषयावरील परिसंवादात उमटला. 

महापालिकेतर्फे नगरविकास सप्ताहांतर्गत आज सायंकाळी पाचला महापालिका सभागृहात "भविष्यातील धुळे-एक दृष्टिक्षेप' या विषयावर परिसंवाद झाला. महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, सेवानिवृत्त अभियंता हिरालाल ओसवाल, के. आर. चौधरी, वास्तुतज्ज्ञ रवी बेलपाठक, उद्योजक किशोर पाटील, नगरसेवक चंद्रकांत केले, आर्किटेक्‍ट योगेश ठाकरे, किशोर डियालानी, प्रा.विलास चव्हाण आदी उपस्थित होते. 

ओसवाल म्हणाले, की जलशुद्धीकरणाची क्षमता 40 एमएलडी वरून 80 एमएलडीपर्यंत वाढवावी लागेल, ग्रॅव्हिटीने पाणी आणून खर्च वाचविल्यास महापालिकेला फायदा होईल. सिवरेज सिस्टिम उभी करताना संपूर्ण शहराचा विचार करावा लागेल, ट्रेचलेस रस्ते बांधल्यास इतर कामांसाठी रस्ते खोदावे लागणार नाहीत, ट्रक टर्मिनस प्रोजेक्‍ट पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिका हद्दवाढ करण्याऐवजी संबंधित गावांना स्वतंत्र नगर परिषदा दिल्यास मनपावर ताण पडणार नाही. उत्पन्न वाढीसह निर्माण केलेल्या सोयी-सुविधा टिकून ठेवण्यासाठी लोकांच्या सहकार्याची उणीव दूर करावी लागेल. 

बेलपाठक यांनी शहराच्या नवीन विकास आराखड्यावर काम व्हायला हवे, 80 फूट- 100 फुटांचेच रस्तेच व्हायला हवेत, भविष्याचा विचार करता शहरावर अवलंबून गावे महापालिका हद्दीत हवीत, शहरातील मोकळ्या जागांचा उपयोग वृक्षारोपण, पार्किंगसाठी करायला हवा असे मत मांडले. किशोर पाटील यांनी सरकारची मान्यता असेल तर शहरातील तीनही महामार्ग उत्पन्नाचे स्रोत म्हणून वापरता येऊ शकतील. बहुमजली पार्किंगची सुविधा निर्माण केल्यास नागरिकांना सुविधा मिळेल शिवाय मनपालाही उत्पन्न मिळू शकेल असे मत मांडले. श्री. केले यांनी लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवून शहर विकासासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. श्री. चौधरी यांनी भविष्याच्यादृष्टीने लगतची खेडी शहरात समाविष्ट व्हावीत, अरुंद रस्त्यांचे वॉल टू वॉल कार्पेट व्हावे, असे सुचविले. डियालानी यांनी शहर विकासासाठी नागरिकांनी कर भरायला हवा, असे मत मांडले. 

तरीही स्वप्न पाहाणे गरजेचे 
आयुक्त धायगुडे यांनी प्रास्ताविकात महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असली तरी भविष्यकालीन शहरासाठी स्वप्न पाहायला हवीत, त्यासाठी सुरवात करायला हवी, असे मत मांडले. प्रा. चव्हाण यांनी सूत्रसंचालन करताना उज्ज्वल शहरासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांची प्रातिनिधिक उदाहरणे देत भविष्यकालीन शहर विकासासाठी तज्ज्ञांची मते मोलाची असल्याचे मत व्यक्त केले. 

नगरसेवकांची पाठ 
भविष्यकालीन धुळे या विषयावरील परिसंवाद ऐकण्यासाठी कमलेश देवरे, कुमार डियालानी वगळता एकही नगरसेवक फिरकला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Smart Dhule