भररस्त्यात युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नाशिक : गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना, आता महिलांच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकवून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्ट्रीटक्राईमच्या या घटनांनी शहरातील महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न उभा राहिला आहे

नाशिक : गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना, आता महिलांच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकवून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

स्ट्रीटक्राईमच्या या घटनांनी शहरातील महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. तर, पंचवटीतील एका युवतीच्या हातातील आय-फोन हिसकावून घेतल्यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने तर महिलांमध्ये भितीचे वातावरण असून पोलीसांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त होते आहे. 

सुनिता सोमनाथ ढाकणे (रा. लोकसहकार, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकिजच्या मागील रस्त्याने सुनिता ढाकणे या गेल्या शुक्रवारी (ता.20) घरी जा त होत्या. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात संशयिताने सुनिता ढाकणे यांच्या हातातील 20 हजार रुपये किमतीची एफ-5 आयफोन बळजबरीने हिसकावला.

त्यावेळी सुनिता यांनी त्यास प्रतिकार केला असता, संशयिताने त्यांना जबर मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एम.एम. शेख हे करीत आहेत. परंतु अद्यापही पोलीसांच्या हाती संशयित लागलेला नाही. 

तसेच, शालिमार चौकात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेलच्या पर्समधूनही चोरट्याने मोबाईल चोरून नेला. विद्या संजय शेलार (रा. गायत्रीनगर, पुणारोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी (ता.21) दुपारी साडेबारा वाजता शालिमार चौकातील कापड दुकानात खरेदी करीत असताना, अज्ञात संशयिताने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधून सॅंमसंगचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला अहे. 
 
मोबाईल लुटीच्या घटनांत वाढ 
एरवी चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावर दागिने ओरबाडून नेण्याचे प्रकार घडत असताना, आता मोबाईल बळजबरीने हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या 18 दिवसांमध्ये मोबाईल हिसकावून नेण्याच्या सात घटना घडल्या आहेत. यात पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घटना घडल्या आहेत. तर, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे घडले आहेत. तर 7 पैकी 4 गुन्ह्यांत महिलांना लक्ष्य केले आहे. महात्मानगर व जेहान सर्कल या दोन्ही घटनांमध्ये महिलांच्या हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने खेचून नेले. यापैकी एकाही घटनेतील संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

Web Title: Snatch mobile and bit a girl