हिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय 

आनन शिंपी
शनिवार, 12 जानेवारी 2019

चाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो, अशा आशावाद सदैव बाळगणाऱ्या योगेश अग्रवालांनी स्वतःच्या हिंमतीवर वाढवलेला वडिलांचा व्यवसाय त्यांच्या कार्यकर्तृत्वाला झळाळी देणारा ठरला आहे. 

चाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो, अशा आशावाद सदैव बाळगणाऱ्या योगेश अग्रवालांनी स्वतःच्या हिंमतीवर वाढवलेला वडिलांचा व्यवसाय त्यांच्या कार्यकर्तृत्वाला झळाळी देणारा ठरला आहे. 

चाळीसगावातील अग्रवाल कुटुंबीय म्हणून उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य नाव. स्वर्गीय मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल यांचा वारसा लाभलेले योगेश अग्रवाल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आ. बं. हायस्कूलमध्येच झाले. अग्रवाल कुटुंबीयांची ऑइल मिल असल्यामुळे योगेश यांच्यावर लहानपणापासूनच उद्योजकाचे बाळकडू मिळत गेले. या काळात त्यांचे वडील रमेशचंद्र अग्रवाल यांनी कन्स्ट्रक्‍शनच्या व्यवसायात चांगला तग धरला होता.

बारावी विज्ञान शाखेत त्यांनी यश संपादन केल्यानंतर 2001 मध्ये बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले व "फायनान्स' या विषयात टिळक विद्यापीठातून योगेश यांनी एम. बी. ए.चे शिक्षण पूर्ण केले. अग्रवाल कुटुंबीयांचे राज्यातील बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे कुठेही साखर कारखाना बांधायचा असो की सूतगिरणी उभारायची असो, रमेशचंद्र अग्रवाल यांना ही संधी मिळायचीच. योगेश यांचे एम. बी. ए. झाल्यानंतर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग वडिलांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी केला व ते सुरवातीला केवळ वडिलांना मदत म्हणून यात उतरले आणि आज त्यांनी त्यांचा कन्स्ट्रक्‍शनचा व्यवसाय आपल्या हाती घेतला आहे. 

व्यवसाय फुलवला 
कन्स्ट्रक्‍शनच्या व्यवसायाला योगेश अग्रवाल यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करता आली. कन्स्ट्रक्‍शन क्षेत्रात दररोज होणारे बदल त्यांनी आत्मसात करून आपल्या ग्राहकांना पाहिजे तशी किंबहुना त्यांच्या अपेक्षांपेक्षाही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच आज त्यांच्या कन्स्ट्रक्‍शनला महाराष्ट्रातच नव्हे; तर देशातील इतर अनेक राज्यांमधील मोठमोठी कामे मिळाली आहेत. या व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी रस्ते असो की कारखाने असो, अशी अनेक चांगली कामे करून लौकिक प्राप्त केला आहे. 

खेळाची आवड 
कुस्तीचा वारसा लाभलेल्या घराण्यात जन्मलेल्या योगेश अग्रवालांवर त्यांचे काका दानशूर नेतृत्व म्हणून जिल्ह्याला परिचित असलेल्या नारायणदास अग्रवाल यांचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात दासबोध, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे चरित्र, नेपोलियनसारख्या लढवय्या महापुरुषांचे चरित्र वाचली आहेत. बॅडमिंटन व शूटिंग रायफलमध्ये योगेश यांनी राज्यस्तरापर्यंत बाजी मारली होती. कालांतराने व्यवसायाच्या व्यापामुळे जास्त वेळ देता आला नाही. मात्र, आजही त्यांनी विविध खेळांची आवड जोपासली आहे. नारायणदास अग्रवाल यांच्या शैक्षणिक कार्याची धुरा देखील योगेश सांभाळत आहेत. त्यामुळेच शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सर्वांत तरुण संचालक म्हणून ते निवडून आले आहेत. 

हिंमतीने संकटांवर केली मात 
छत्तीसगड राज्यात एका कारखान्याच्या बांधकामाचे काम रमेशचंद्र अग्रवाल यांनी घेतले. हा परिसर पूर्णतः नक्षलवाद्यांचा होता. स्थानिक मजुरांना काम मिळावे, यासाठी एक दिवस संपूर्ण गावच्या गाव त्यांच्या कामावर आले व त्यांनी काम बंद पाडले. भाषा वेगळी, प्रांत वेगळा, परिचयाचे कोणी नाही अशी परिस्थितीत योगेश अग्रवाल यांनी आपल्या वडिलांसोबत ही परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळली व घेतलेले काम पूर्ण केले. 

मुख्यमंत्र्यांकडून गौरव 
नांदेडला भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूतगिरणीचे काम योगेश अग्रवाल यांनी घेतले आणि दिलेल्या मुदतीत ते पूर्ण केले. ही सूतगिरणी म्हणजे, राज्यातील बांधकामाचा उत्कृष्ट नमुना ठरावी, अशी त्यांनी बांधली आहे. या कार्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते योगेश अग्रवाल यांचा जाहीर कार्यक्रमात गौरव केला होता. 

आपल्यामध्ये क्षमता आहे, त्यापेक्षा जास्त "रिस्क' घेण्याची तयारी ठेवावी. कुठल्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर हिंमत ठेवून कष्ट, जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवून हे काम करावे म्हणजे यश मिळाल्याशिवाय राहत नाही. 
- योगेश अग्रवाल, युवा उद्योजक, चाळीसगाव

Web Title: a son spreads his father s business