सोनगीरच्या भांडी उद्योगाने टाकली कात!

एल. बी. चौधरी
सोमवार, 26 मार्च 2018

सोनगीर (ता. धुळे) - स्टीलच्या भांड्यांमुळे पारंपरिक कलाकुसरीच्या तांब्या-पितळेच्या भांड्यांना मागणी तुलनेने कमी होणे, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ यामुळे भांडी उद्योग काहीसा अडचणीत आला आहे; पण येथील व्यावसायिकांनी आधुनिकतेची कास धरत भांडी उद्योगाबरोबरच कळस, देवीचे मुखवटे, तांब्याचे फिल्टर आदी वस्तू बनवीत व्यवसाय टिकवून ठेवला आहे.

सोनगीर (ता. धुळे) - स्टीलच्या भांड्यांमुळे पारंपरिक कलाकुसरीच्या तांब्या-पितळेच्या भांड्यांना मागणी तुलनेने कमी होणे, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ यामुळे भांडी उद्योग काहीसा अडचणीत आला आहे; पण येथील व्यावसायिकांनी आधुनिकतेची कास धरत भांडी उद्योगाबरोबरच कळस, देवीचे मुखवटे, तांब्याचे फिल्टर आदी वस्तू बनवीत व्यवसाय टिकवून ठेवला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर (ता. धुळे) हे 25 हजार लोकवस्तीचे व्यापारी पेठेचे गाव आहे. येथील सुमारे दोनशे कुटुंबे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायात असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. येथील कारागिरांनी देवींचे मुखवटे, मंदिरावरील कळस, महादेवाच्या शिवलिंगावरील तांब्याचा नाग, तांब्याची शिवलिंग, त्रिशूळसह स्वयंपाकासाठी विशेषतः मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी लागणारी लहान डेग, पाणी फिल्टर, फ्रिज बॉटल, लहान पणत्या एवढेच नव्हे तर योगसाधनेसाठी लागणारे पिरॅमिड्‌सही तयार केले जातात. येथील कारागिरांनी बनवलेले कळस देशातील बहुसंख्य प्रमुख मंदिरांवर डौलाने उभे आहेत.

सध्या तांब्याचा कच्च्या मालाचा दर साडेपाचशे रुपये किलो आहे. मजुरीच्या खर्चानुसार तयार वस्तू सहाशे ते सातशे रुपये किलो दराने विकल्या जातात. पितळेच्या कच्च्या मालाची किंमत साडेचारशे रुपये किलो आहे. तयार वस्तू पाचशे रुपये किलो दराने विकल्या जातात. भांडी तयार करण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू महागडी असून, कोळसाही मिळत नसल्याने भांड्यांचे दर कमी-जास्त होतात.

पितळाचा एक हंडा एक ते दीड हजार रुपयांत मिळतो. तोच स्टीलचा हंडा दोनशे रुपयांत मिळतो. त्यामुळे स्टीलला अधिक मागणी आहे.

दृष्टिक्षेपात भांडी उद्योग
* तांबे कच्चा माल- 550 रुपये किलो
* तांब्याची तयार भांडी- 600 ते 700 रुपये किलो
* पितळ कच्चा माल- 450 रुपये किलो
* पितळेची तयार भांडी- 500 रुपये किलो
* एकूण कारागीर- 250
* स्थानिक व्यापारी- 12
* व्यवसायावर अवलंबून कुटुंबे- 200
* वार्षिक प्रतिकुटुंब उलाढाल- तीन ते पाच लाख रुपये
* सर्वाधिक मागणी- घागर, हंडा कळशी, घंगाळ, तबक
* वैशिष्ट्यपूर्ण भांडी- पाणी तापविण्याचा बंब, कळस, पिरॅमिड्‌स, देवतांचे मुखवटे आदी

Web Title: songir news Utensils industry