वडिलांचे दारु, परस्त्रीचा नाद अन् कर्ज..वैतागली होती 'मुले'...शेवटी मुलांनीच..

son killed father.jpg
son killed father.jpg

नाशिक : घोटीत वडील आणि आजोबाची हत्या तिघा मुलांनीच केल्याचा छडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत लावत संशयित म्हणून तिघा मुलांना ताब्यात घेतले. रविवारी पाचला न्यायालयात हजर केले असताना त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. 

पोटच्या तिघा मुलांकडून वडील, आजोबांची हत्या

घोटी खुर्द येथील ज्ञानेश्‍वर फोकणे व काशीनाथ फोकणे या मुलगा आणि वडिलांचा शुक्रवारी मध्यरात्री खून करण्यात आला होता. पोलिसांनी याबाबत घरातील माणसाकडून घडलेल्या घटनेची माहिती घेताना ज्ञानेश्‍वरांच्या तीन मुलांची स्वतंत्ररीत्या चौकशी केली. पोलिसांना चौकशीत विसंगती आढळली. तसेच घरात एवढी मोठी घटना घडूनही तिघांच्या चेहऱ्यावर कोणतेही दु:ख दिसत नव्हते. त्यांच्या देहबोलीबाबतही पोलिसांना संशय वाटल्याने पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी ज्ञानेश्‍वर आणि काशीनाथ फोकणे यांचा अंत्यविधी झाल्यावर रात्री दहाला तिघांना ताब्यात घेतले. 

दारूच्या व्यसनाला कंटाळून काढला काटा; मिळकत विक्रीस विरोध 

वडिलांना असलेले दारूचे व्यसन आणि परस्त्रीशी संगत यातून कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्याची फेड करण्यासाठी ते काही मिळकत विकण्याच्या विचारात होते. मुलांनी त्यांना याबाबत अनेकदा समजावले, परंतु ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आजोबांचा त्यांना पाठिंबा असल्याने मुले हतबल झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेत हत्या केल्याचे तपासात उघड झाले. 

धारदार शस्त्राने व लोखंडी हत्याराने त्यांची हत्या

वडिलांना व आजोबांना दारू पिण्याची सवय असल्याने याचा फायदा घेण्यासाठी मुलांनी त्यांना विदेशी मद्य तसेच गावठी दारूचा एक फुगा आणून दिला होता. शुक्रवारी रात्री घरातील सर्वांनी एकत्र जेवण केले व संशय येऊ नये म्हणून सर्व जण हॉटेलवर गेले. दारूमुळे वडील व आजोबा शुद्धीत नव्हते. याचा फायदा घेत धारदार शस्त्राने व लोखंडी हत्याराने त्यांची हत्या करण्यात आली. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत. 

फुगलेल्या दरवाजाने बिंग फुटले.. 
बंगल्याचा मुख्य दरवाजा पावसामुळे फुगल्याने लागत नव्हता. सेफ्टी दरवाजावरच काम भागविले जात होते. तो दरवाजा हात घालून कसा उघडायचा हे कुटुंबातच माहिती होते. या तर्कावरच पोलिस संशयित आरोपीपर्यंत पोचले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com