तळवाडे दिगर येथे पाऊस लांबल्याने पेरण्या ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

रोशन भामरे : तळवाडे दिगर :  रोहिणीनंतर मृग नक्षत्रही कोरडे गेले आहे. नुकतीच स्वाती नक्षत्राला सुरुवात झाली असून या नक्षत्रात तरी पाऊस पडावा, यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाऊस लांबल्याने पेरणीची कामे खोळंबली असून, पेरणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला आहे. पाऊस कधी येतो व थंडावा निर्माण करतो, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जून महिन्याचा पूर्वार्ध संपला तरी, मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही.

साधारणपणे जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात होते. हाच अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली. मशागतीची कामे पूर्ण झाली तरी, पावसाचा थेंबही पडला नाही. उलट कडक ऊन पडत आहे. दिवसा व रात्रीसुद्धा उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याचे दिवस नसून कडक उन्हाळा असावा,असे वातावरण निर्माण होत आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र पुन्हा तापमानात वाढ झाली. उकाडा आणखी असह्य झाला आहे.  हवामान खात्याने 17 जून नंतर मान्सून बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र,तो ही फेल ठरला आहे. हवामान खात्यांचे अनेक अंदाज फेल ठरत असल्याने शेतकऱ्यांनी हंगामाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिला आहे.
स्वाती नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. पैशांची अडचण असल्याने पिक कर्जासाठी बँका व सोसायट्यांकडे चकरा शेतकऱ्यांनी वाढविल्या आहेत. शासनाने सुरु केलेल्या पंतप्रधान स्वाभिमान योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तसेच मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात मागे पडल्या आहेत. पावसाने दगा दिल्यास पिक करपण्याची शकता असते, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sowing squeezed due to rainfall in the Talwade digar