विशेष सरकारी वकील मिसर यांच्या जीवाला धोका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक : नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातील मोक्का अन्वये कैदेत असलेल्यांनी विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांचा 'गेम' करण्याचा कट रचला आहे. अशा आशयाचे पत्र कारागृह प्रशासनाला मिळाले आहे. त्यानुसार अॅड. मिसर यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली असून या पत्राची पोलीस महासंचालकांनीही गंभीर दखल घेतली आणि पोलीस आयुक्तांना संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. 

नाशिक : नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातील मोक्का अन्वये कैदेत असलेल्यांनी विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांचा 'गेम' करण्याचा कट रचला आहे. अशा आशयाचे पत्र कारागृह प्रशासनाला मिळाले आहे. त्यानुसार अॅड. मिसर यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली असून या पत्राची पोलीस महासंचालकांनीही गंभीर दखल घेतली आणि पोलीस आयुक्तांना संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. 

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन प्रवेशद्वारांच्या मधोमध बंदीवानासाठी एक तक्रार पेटी ठेवण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी गेल्या 2 जुलै रोजी तक्रार पेटीतील पत्रांची तपासणी केली असता, त्यामध्ये एक निनावी पत्र आढळून आले आहे. कारागृहातील एका बराकीमध्ये 70 ते 80 कैदीपैकी एका बंदीने ते पत्र लिहिले आहे. त्यामध्ये बंदी ज्या बराकीत राहतो, त्याच बराकीमध्ये मोक्कामधील कैदी आहेत. मोक्काचे दावे विशेष सरकारी वकील अजय मिसर लढवितात. न्यायालयात ते जोपर्यंत दावा लढविणार, तोपर्यंत आपली सुटका वा निर्दोष मुक्तता होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे त्यामुळे अॅड. मिसर यांचा 'गेम' करण्यासंदर्भातील चर्चा त्या मोक्काच्या आरोपींमध्ये झाल्याचे त्या पत्रात म्हटले आहे.

त्यांची नावे सांगू शकत नसल्याचेही त्या निनावी पत्र लिहिणाऱ्या बंदीवानाने म्हटले आहे. अॅड. अजय मिसर यांच्या जीवाला कारागृहाबाहेरी गुन्हेगारांकडून धोका पोहोचू शकतो असेही पत्रात म्हटले आहे. 
कारागृह अधीक्षकांनी हे पत्र पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पाठविले असून त्यानुसार अॅड. मिसर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या पत्राची पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनीही दखल घेतली असून त्यांनी तातडीने शहानिशा करण्याची व संशयितांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांना दिले आहेत. यापूर्वी अॅड. मिसर यांना जीवे मारण्याच्या धमक्‍या देण्यात आल्या आहेत. 

अॅड. मिसर यांच्याकडे महत्त्वाचे खटले 
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडे, पंचवटीच्या टोळी युद्धातील खुन प्रकरण, चांदवड शस्त्रसाठा प्रकरण, शेख लालबाबा, हिमायत बेग, अबु जुंदाल ही दहशतवाद स्वरुपाच्या खटल्यांसह वाडिवऱ्हे-सुरगाणा धान्य घोटाळा, धुळ्याचा सोनगीर हत्याकांड, सिडकोतील टिप्पर गँग, चेतन पगारे, भरत नेपाळी, पांगरमल दारुकांड, औरंगाबादचे वर्धन खून या प्रमुख खटल्यांची जबाबदारी आहे. तर मोक्‍क्‍याची सुमारे 12 खटले ते सरकारी पक्षातर्फे चालवित आहेत. धमकीप्रकरणी पोलिसांनी अॅड. मिसर यांच्याकडील खटल्यांची व त्यातील आरोपींची माहिती घेतली असून त्यादृष्टीने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची माहिती घेतली जात आहे. 

यापूर्वीही धमक्‍या मिळाल्या आहेत. त्यात आणखी एका धमकीची भर पडली आहे. पोलीस तपास सुरू आहे, त्यातून होईल निष्पन्न.

- अॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील

Web Title: Special public prosecutor misar risks his life