महिला मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान 

महिला मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान 

धुळे - जिल्ह्यात जनगणनेनुसार असलेले स्त्री-पुरुषांचे प्रमाण आणि मतदारयादीनुसार असलेले स्त्री-पुरुषांचे प्रमाण यातील तफावत दूर करण्यासाठी महिला मतदारांची नोंदणी वाढविणे आणि महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक महिलादिनी महिला मतदारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्हा निवडणूक शाखेने नियोजन केले असून, या अभियानासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. 

महिलादिनी म्हणजेच 8 मार्च 2017 ला तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रात, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयात महिला मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येईल. महिला मतदार नोंदणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत नियोजन पूर्ण करून 1 मार्च 2017 पासून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल. मार्च 2017 मध्ये जिल्ह्यात 12000 महिला मतदारांची नोंदणी झाली, तर मतदार यादीचे स्त्री- पुरुष प्रमाण 946 पर्यंत येऊ शकते. तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत मतदार मार्गदर्शन कक्ष कार्यान्वित आहे असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयसिंगराव वळवी यांनी स्पष्ट केले. 

प्रमाण वाढविण्याच्या सूचना 
धुळे जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार स्त्री- पुरुषांचे प्रमाण 946 इतके आहे, तर 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध मतदार यादीनुसार हेच प्रमाण 931 एवढे आहे. पुरुष मतदारांची संख्या 8,00,137, तर महिला मतदारांची संख्या 7,44,887 एवढी आहे. प्रधानसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मतदार नोंदणी वाढविणे आणि महिलांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचित केले आहे. 

अशी होऊ शकते मदत 
महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महिला वसतिगृहे, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, महिला बचत गट,, विविध अशासकीय आणि स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित महिला यांचे सहकार्य घेऊन अद्याप ज्या महिला मतदारांची नोंदणी झालेली नाही, अशा महिलांची प्रामुख्याने मतदार नोंदणी करणे, विवाहित महिलांची पूर्वीची नोंदणी रद्द करून नवीन ठिकाणी मतदार नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात येईल. 

नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे 
मतदार नोंदणीसाठी आवश्‍यक असलेले अर्ज क्रमांक 6 तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत. 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण आहे, अशा महिलांना मतदार नोंदणी लगेच करता येईल. विहित नमुना क्रमांक 6 सोबत वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहन परवाना इ.), रहिवास पुरावा (वीज बिल, दूरध्वनी बिल, पारपत्र, गॅस जोडणी कार्ड, बॅंक पासबुक, आधार कार्ड इ.) झेरॉक्‍स प्रत व दोन फोटो आवश्‍यक आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com