मनमाडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवन योजनेस गती मिळावी

manmad
manmad

मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेस गती द्यावी.

राज्यात पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेले मनमाड हे एकमेव शहर आहे. पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने ४० वर्षांपासून येथे पाणीटंचाई आहे. विविध पाणी योजना राबविल्या गेल्या मात्र शाश्वत पाणी मिळाले नाही. शहराचा विकास खुंटला बेरोजगारी वाढली अनेकांनी इतर शहरांत स्थलांतर केले. शिक्षण, रोजगार, दवाखाना यांचीही कमतरता आहे. सध्या पालखेड धरणाचे अवर्तन मिळते. पण तेही पुरत नाही १५ ते २० दिवसांनी महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाई अधिक जाणवते पाणीप्रश्न सुटावा यासाठी विविध पर्याय पुढे आले. मात्र शाश्वत नाही. त्यामुळे करंजवन हा शाश्वत पाण्याचा पर्याय पुढे आला. करंजवन ते मनमाड ८० किमीची थेट पाईपलाईन घेण्याच्या दृष्टीने सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. करंजवनमधून १३५ लिटर प्रतिमानसी पाणी मिळावे अशी मागणी पालिकेने केली आहे. तर पालखेडचे आरक्षण कायम ठेवून ६५ लिटर प्रतिमानसी पाण्याची मागणी जीवन प्राधिकरण करत आहे. ६५ लिटर प्रतिमानसी प्रमाणे योजना केली तर  सव्वादोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर १३५ लिटर प्रतिमानसी प्रमाणे केली. तर खर्च अधिक आहे. योजना मंजूर झाली. तर करंजवन येथे नवा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. पाणी उचलण्यासाठी १०० हॉस्पॉवरचे दोन पंप बसवणार आहे. जलकुंभातून नैसर्गिक उताराने पाणी ७०० एमएमएस व्यासाच्या डीआय पाईपलाईनद्वारे थेट मनमाड येथे वागदर्डी धरणावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या १५ एमएलटीच्या फिल्टरमध्ये घेण्यात येईल. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी डीआय पाईपलाईन टाकावी लागणार आहे. विशेष म्हणजे पाईपलाईन रस्त्याच्याकडेने येणार असल्याने जमीन अधिग्रहणाचा विषयच राहिला नाही. पाईपलाईनच्या मार्गावर २० ते ३० नाले आहे. तर दोनशेच्या आसपास एअरऑल असणार आहे.  

करंजवन योजना करत असतांना सध्या असलेल्या पालखेड योजनेला ३० वर्ष पूर्ण न झालेल्याने तिचे करायचे काय, त्यावर झालेला खर्च, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेऊन पाटोदा साठवण तलावा वाढविण्यात आला, नवीन बांधकाम खर्च, वाढीव पाणीपुरवठा योजना आदींचे करायचे काय असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे. 

करंजवन पाणी योजना
- खर्च अंदाजे २.२५ कोटी (सव्वा दोनशे कोटी)
-प्रतिमानसी १३५ लिटर मागणी
- करंजवन ते मनमाड ८० किमी थेट पाईपलाईन 
- ८० किमी ७०० एमएमएस व्यास डीआय पाईपलाईन 
- १५ एमएलटीचे नवीन फिल्टर हाऊस
- ८० कीमीमध्ये येणार २० ते ३० नाले 
- पाईपलाईनवर अंदाजे दोनशे एअरऑल  
- करंजवन येथे नवीन जलकुंभ
- शंभर हॉस्पॉवरचे लागणार दोन पंप 
- करंजवन ते मनमाड पाणी येणार नैसर्गिक उताराने 
- रस्त्याच्याकडेने पाईपलाईन त्यामुळे जमीन अधिग्रहणाचा विषय नाही
- सर्वेचे काम पूर्ण 
- पाणी आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू 
- लोकसंख्येनुसार पुढील ३० वर्षासाठीची योजना 

करंजवन योजना पूर्ण झाल्यास
- ४० वर्षाचा पाणीप्रश्न मिटेल 
- पाणीटंचाईचे शहर ही ओळख पुसेल 
- शहराचा विकास होईल  
- औद्योगिकरण वाढेल
- बेरोजगारी दूर होईल
- नागरिकांना रोज मुबलक पाणी मिळेल 
- पंपिंगवर होणारा कोटींचा खर्च वाचेल 

सध्याची परिस्थिती
- एकही शाश्वत पाणी योजना नाही
- वर्षभर पाणीटंचाई
- १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा
- पाण्यासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ 
- पाटोदा पंपिंग स्टेशनचे वीजबिल वर्षाला १ कोटी ८५ लाख १९ हजार
- वागदर्डी धरणावर २४ च्यावर बंधारे 
- ३५ च्यावर अनधिकृत विहिरी 
- शहराचा विकास पूर्णपणे खुंटला 
- बेरोजगारीत वाढ
- नाशिक, मुंबई, औरंगाबाद, पुणे आदी शहरांना कामासाठी पसंती 
- औद्योगिक वसाहत नाही, चांगले दवाखाने, शाळा, कॉलेज नाही  
- मोठी शासकीय कार्यालये नाही जी होती ती इतरत्र हलविण्यात आली 

करंजवन योजनेसाठी पालकमंत्री गिरीश महाजन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे सर्वस्तरावर प्रयत्न सुरू आहे सर्वेसाठी पालिकेतर्फे पैसेही भरले आहे एमजीपी व इरिगेशन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार आहे
- गणेश धात्रक, माजी नगराध्यक्ष तथा  गटनेते 

करंजवन मनमाडला तारणारी योजना आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा यामुळे पाणीप्रश्न सुटेल नागरिकांना मुबलक पाणी मिळेल औद्योगिकरण होईल बेरोजगारांना काम मिळेल पंपिंग विज बिलावर होणारा कोटींचा खर्च वाचेल  शहराचा विकास होईल
- अशोक परदेशी, जनहित याचिकाकर्ते 

मनमाडची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक पर्याय पुढे आले मात्र एकही शाश्वत आढळून न आल्याने करंजवन हीच शाश्वत, योग्य व पाणीटंचाई दूर करणारी योजना आहे
- डॉ दिलीप मेनकर, मुख्याधिकारी

करंजवन योजनेचा सर्वे पूर्ण झाला आहे प्रतिमानसी ६५ लिटर की १३५ लिटर करायचे याचा पालिकेने ठराव द्यावा ६५ ने योजना केली तर सव्वादोनशे कोटी तर १३५ ने केली तर तीनशे कोटींच्या पुढे खर्च अपेक्षित आहे 
- नंदकिशोर लोगांने, अभियंता, जीवन प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com