स्पोर्टस बाइकवरील प्रवास जिवावर बेतला

Ganesh-Kothawade
Ganesh-Kothawade

सिडको - परिसरातील खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश कोठावदे (वय २७, रा. फिटनेस जिम, साळुंखेनगर, खुटवडनगर, नाशिक) याचा सोलापूरजवळील उमरगा येथे अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा मित्र मुन्नीलाल (३५, रा. नाशिक) गंभीर जखमी झाला. दीड लाखाच्या स्पोर्टस बाइकवरून जात असताना हा अपघात झाला. 

गणेश कोठावदे हा फिटनेस फाइट क्‍लब या जिमचा संचालक व फिटनेस कोच म्हणून काम करीत होता. शरीरसौष्ठवपटू म्हणूनही त्याचा नावलौकिक होता. डिसेंबरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तो नाशिकचे प्रतिनिधित्वही करणार होता. त्याच्या मृत्यूने नाशिककरांनी उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गमावल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. गणेश व त्याचा मित्र मुन्नीलाल हे दोघेही दुचाकीने सोलापूर येथे गेले होते.

तिकडून परतताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बसव कल्याणजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली. त्यामुळे गणेश व मुन्नीलाल दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर आदळले. यात डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू, तर मुन्नीलाल गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उमरगा येथे उपचार सुरू आहेत.

गणेश सहकारतज्ज्ञ भास्कर कोठावदे यांचा पुतण्या असून, त्याचे वडील आत्माराम कोठावदे मायको कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत. या वर्षीच गणेशच्या विवाहाची तयारी सुरू होती. त्यासाठी वधूसंशोधनही सुरू होते. मात्र बोहोल्यावर चढण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली.

अपघातप्रवण ठिकाण
गणेश कोठावदे याचा ज्‍या ठिकाणी मृत्‍यू झाला ते ठिकाण अपघातप्रवण आहे. बसव कल्‍याण येथे महामार्गावर काहीशी अरुंद जागा असल्‍याने वेगातील वाहने एकमेकांना धडकून अनेकदा अपघात झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com