दहावीच्या भूगोलात राष्ट्रीय सीमांबाबत चुका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे दहावीचे भूगोल विषयाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय सीमा अन्‌ राष्ट्रध्वजाबद्दलच्या चुका आहेत.

नाशिक - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे दहावीचे भूगोल विषयाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय सीमा अन्‌ राष्ट्रध्वजाबद्दलच्या चुका आहेत.

सटाणा येथील माजी प्राचार्य के. यू. सोनवणे यांनी ही माहिती बुधवारी येथे दिली. तसेच पाठ्यपुस्तक मंडळाच्या समीक्षण सत्रामध्ये यासंबंधी केलेल्या सूचनांची दखल घेतली गेली नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.
सोनवणे म्हणाले, की पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणातील नवव्या पानावर देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. त्यातील अशोक चक्राचा रंग "ध्वज संहिते'प्रमाणे छापलेला नाही. पुस्तकात तांत्रिक मर्यादा हे दिलेले कारण अनाकलनीय असून, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. तिसऱ्या प्रकरणातील पान क्रमांक 24 वरील भारतीय भूमीच्या आराखड्यात जम्मू-काश्‍मीरच्या नियंत्रणरेषेच्या उत्तरेकडील मोठा भूभाग स्पष्ट होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये काश्‍मीर व लडाखच्या उत्तर सीमेबाबत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा आराखडा पुस्तकातून काढण्यात यावा.

सोनावणे यांनी उपस्थित केलेले मुद्दे
- पहिल्या प्रकरणातील क्षेत्रभेटमध्ये "मॅडम' हा आंग्लभाषिक शब्द 17 वेळा वापरला.
- पान क्रमांक पाचवरील देवटाक्‍याच्या रंगीत चित्रातील पाणी काळे दिसते. ते निळसर दाखवणे आवश्‍यक होते.
- सिंहगडावरील खाद्यपदार्थांच्या थाळीचे छायाचित्र निरर्थक वाटते.
- पान सातवर कुलाबा किल्ला किनाऱ्यापासून "दूर' समुद्रात आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याऐवजी अंतराचा उल्लेख व्हायला हवा होता.
- जगाच्या आराखड्यात आयर्लंडहून लहान देश दिसतात, पण आयर्लंड पाहिला दिसत नाही.
- प्रकरण तीनमधील पान क्रमांक 15 वरील ब्राझीलच्या नकाशात ब्राझीलिया शहराच्या नावात चूक झाली
- नकाशांमध्ये दिशादर्शक चिन्हांचा वापर नाही
- गंगेची उपनदी म्हणून ब्रह्मपुत्रा असा उल्लेख खटकणारा आहे
- "नैर्ऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात' या उल्लेखाऐवजी "दिशा बदलतात' अशी दुरुस्ती आवश्‍यक
- पान 46 व 47 वरील चार रंगीत आणि पान 49 वरील दोन उपग्रहीय प्रतिमांची चित्रात भडक रंगसंगती आहे

Web Title: ssc geography book national border wrong