चालकाची ड्यूटी २२ तास...

राजेश सोनवणे
शुक्रवार, 28 जून 2019

सकाळी सुटलेली बस त्याच दिवशी परत येत नाही. गर्दीचा हंगाम असल्यास एखाद्यावेळी बस त्याच दिवशी परत मार्गस्थ करत असतो; इतर दिवशी असे होत नाही.
- प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव

एसटीचा जळगाव-पुणे-जळगाव प्रवास; प्रवाशांचा जीव धोक्‍यात
जळगाव - एसटीचालक एका दिवसात म्हणजे २४ तासांत २२ तास वाहन चालवत असेल, तर हा प्रवास सुरक्षित कसा म्हणायचा? होय, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव-पुणे फेरी पूर्ण केल्यानंतर तेथून अर्ध्या तासातच दुसरी पुणे-जळगाव गाडी घेऊन परतायचे. सलग २२ तास, तब्बल आठशेपेक्षा अधिक किलोमीटर गाडी चालवण्याचा हा प्रकार जळगाव आगारात होत आहे.

आगाराचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने जादा फेऱ्या केल्या जातात. हे स्थानिक पातळीवर योग्य असले, तरी लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांसाठी ते शक्‍य नाही. शिवाय, हे महामंडळाच्या नियमातही बसत नाही. मात्र, जळगाव-पुणे मार्गावर दिवसभरातून केवळ जळगाव आगारातून दिवसा चार आणि रात्री दोन बस सोडण्यात येतात. जळगाव आगारातून पहाटे पाचला सुटणारी बस पुण्याला पोचल्यानंतर तेथे मुक्‍कामी थांबून दुसऱ्या दिवशी पहाटे जळगावकडे मार्गस्थ होणे अपेक्षित आहे. पण असे न होता दहा-साडेदहा तास धावून ही बस पुण्यात दुपारी तीन-साडेतीनला पोचते आणि केवळ एक तास आराम करून चालक आपली बस घेऊन साडेचारच्या सुमारास जळगावसाठी मार्गस्थ होतो.

विभाग नियंत्रक फोन उचलेना
याबाबत विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांना ७५८८८७८७८७ या क्रमांकावर संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही; किंवा त्यानंतर उत्तरही आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Driver 22 Hours Duty Danger