लोकसहभागातून नकट्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यास सुरुवात

भगवान जगदाळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत चव्हाण, मंडळाधिकारी सुकदेव चित्ते, तलाठी प्रशांत माळी, भूषण रोजेकर, सुनील साळुंखे, धनंजय वाघ, ग्रामपंचायत सदस्य दीपक देवरे, चंद्रकांत जाधव आदींसह ट्रॅक्टर मालक-चालक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या परवानगीने ग्रामस्थांनी 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' उपक्रमातून शेतकऱ्यांसह जलयुक्त शिवार अभियानास बळकटी देण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांना हजारो ट्रॅक्टर गाळ नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिला जाणार असून त्यामुळे नकट्या बंधारा गाळमुक्त होऊन शेतजमीन गाळयुक्त व सुपीक होणार आहे. तहसीलदार भोसले, मंडळाधिकारी चित्ते, एपीओ चव्हाण, माजी सभापती सुका चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले व शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहनही केले.

माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण यांच्यासह भय्या ढिवरे, संदीप भलकारे, पावबा सूर्यवंशी, देविदास माळी, दिलीप जाधव, लोटन जाधव, न्हानू सूर्यवंशी, नामदेव पिंपळे आदींच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी तहसीलदार संदीप भोसले यांनी जेसीबीला श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. ग्रामस्थांतर्फे तहसीलदार भोसले, मंडळाधिकारी चित्ते, रोहयोचे एपीओ चव्हाण व तलाठ्यांचा सत्कार करण्यात आला.

"या उपक्रमामुळे नकट्या बंधारा गाळमुक्त होऊन त्याचे खोलीकरण होण्यासह भविष्यात जलसाठा वाढेल व परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमीन गाळयुक्त, सुपीक होण्यास मदत होईल."
- संदीप भोसले, तहसीलदार, साक्री

Web Title: starting of cleaning of bandhara