बद्रिनाथहून चारचाकी वाहने सोडण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

आज वाहतूक सुरळीत शक्‍य; टॅक्‍सीसह हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर

आज वाहतूक सुरळीत शक्‍य; टॅक्‍सीसह हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर
नाशिक - उत्तराखंडमधील ऋषिकेश- बद्रिनाथ महामार्गावरील हत्तीपर्वत येथे भूस्खलन झाल्याने कोसळलेली दरड फोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. आज दुपारपासून बद्रिनाथमधून चारचाकी वाहने सोडण्यास सुरवात झाली. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्‍यता आहे, असे बद्रिनाथमधील महाराष्ट्रातील भाविकांचे उपाध्य बाबूलालशास्त्री यांनी "सकाळ'ला सांगितले.

पीपलकोठी ते हरिद्वार या जवळपास दोनशे किलोमीटरच्या अंतरासाठी 15 हजार रुपये भाडे टॅक्‍सीवाले मागत आहेत. तसेच, पीपलकोठीमधील हॉटेल व्यावसायिकांनी 800 ते एक हजार रुपयांचे भाडे साडेतीन ते पाच हजार रुपये सांगण्यास सुरवात केली आहे. बद्रिनाथहून दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांची सुविधा करणारे ट्रॅव्हल कंपनीचे व्यवस्थापक काळू चौधरी यांनी ही माहिती भ्रमणदूरध्वनीवरून दिली. बाबूलालशास्त्री म्हणाले, की बद्रिनाथमध्ये दर्शनासाठी दिवसाला किमान आठ हजार भाविक येत असतात; पण महामार्ग बंद असल्याने मुक्कामी असलेले भाविक दर्शन घेत आहेत. आमच्याकडे कोपरगाव (जि. नगर) येथील पन्नास भाविक मुक्कामी आहेत. बद्रिनाथमध्ये असलेले सर्व भाविक सुरक्षित असून, त्यांना कसल्याही प्रकाराचे चढे भाव आकारले जात नाहीत. बद्रिनाथमध्ये किमान दोनशे बसगाड्या आहेत. महामार्गावर कोसळलेल्या दरडीचा खडक टणक असल्याने तो फोडण्याखेरीज पर्याय उरला नाही. टणक खडक कोसळल्यास अलकनंदा नदीचा प्रवाह खंडित होऊन त्याचा फटका महामार्गाला बसण्याची शक्‍यता असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.

नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीतर्फे बद्रिनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या चार बसगाड्या हत्तीपर्वतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर होत्या. दरड कोसळल्याने बसगाड्यांसह भाविक अडकून पडले. मग कंपनीच्या व्यवस्थापकांनी चार किलोमीटर पर्वतावरून चालत जोशीवाडा परिसरात पोचल्यावर टॅक्‍सी करून पीपलकोठीला हॉटेलमध्ये जाऊ, असे सांगितले. त्यानुसार शंभर भाविक पर्वतावरून पायी जोशीवाडा परिसरात पोचले. इथून टॅक्‍सीने सर्व भाविकांना पीपलकोठीला नेण्यात आले. सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत, असे कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितले.

थेट पीपलकोठीमधून
विलास शिंदे आणि छाया शिंदे (टाकळीरोड, नाशिक) - बद्रिनाथचे दर्शन घेऊन परतत असताना दरड कोसळलेल्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आमची बसगाडी होती. बसगाडी थांबताच धुराळा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आम्ही पर्वतावरून येत असताना जवानांनी आम्हाला प्यायला पाणी दिले. आजी- आजोबांना जवानांनी उचलून आणले.

ओमकार महाजन (नाशिक) - पाऊस पडतोय. ढगाळ हवामान आणि थंडी भरपूर आहे. उद्या सकाळपर्यंत पुढील प्रवासाला सुरवात होईल, अशी माहिती आम्हाला देण्यात आली आहे.

Web Title: Starting from four-wheeler vehicles in Badrinath