पूरग्रस्तांना मदत करण्यात शासन अपयशी : डॉ. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सामाजिक संस्था व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहेत. भाजपचे आमदार, खासदार फक्त फेऱ्या मारत आहेत.

चाळीसगाव : कोल्हापूर, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यात शासन अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना एकरकमी रक्कम खर्च करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते तथा माजी खासदार डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

नागपूरला जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर काही वेळ कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर हे थांबले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, की पुरामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी लातूरच्या बाबतीतही सरकार असेच उदासीन होते. अलमट्टी धरणाबाबत जी दक्षता महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही.

वास्तविक वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही शासनाने कुठल्याच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आज ही शहरे पाण्याखाली आली आहेत. अशा परिस्थितीत शासनाने मदतकार्यासाठी पुढे यायला पाहिजे. सामाजिक संस्था व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहेत. भाजपचे आमदार, खासदार फक्त फेऱ्या मारत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केवळ विमानातून पाहणी केली. तेथील प्रशासनाला कुठल्याच सूचना दिल्या नाहीत. दोन, तीन दिवसांपासून पाण्यात असलेल्या तेथील नागरिकांना ब्लँकेट, उबदार कपडे, औषधी, चहा, नाष्टा, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा करावा. यासाठी समाजातील सेवाभावी संस्थांनी देखील पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government failed to help flood victims says Dr Ambedkar