शरद पवारांकडे परतलेल्या 'या' आमदारांच्या विधानांमुळे गोंधळात भर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

राजभवनातील शपथविधीनंतर नाशिकमध्ये परतल्यावर "मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे,' असा निर्वाळा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिला. पण विधिमंडळ गटनेत्यांचा आदेश पाळला, त्यांचा आदेश चूक की बरोबर हे पक्षाने ठरवावे, इथपासून ते कर्जमाफीसाठी केंद्राची मदत घ्यावी, अशी विधाने बनकरांनी केल्याने गोंधळात भर पडली. याशिवाय राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीनंतर "नॉट रिचेबल' असल्याचे जाहीर केले. त्यात दिंडोरीचे नरहरी झिरवाळ आणि कळवणचे नितीन पवार यांचा समावेश आहे. 

नाशिक : राजभवनातील शपथविधीनंतर नाशिकमध्ये परतल्यावर "मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे,' असा निर्वाळा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिला. पण विधिमंडळ गटनेत्यांचा आदेश पाळला, त्यांचा आदेश चूक की बरोबर हे पक्षाने ठरवावे इथपासून ते कर्जमाफीसाठी केंद्राची मदत घ्यावी, अशी विधाने बनकरांनी केल्याने गोंधळात भर पडली.

Image may contain: 1 person, smiling, hat, closeup and outdoor

याशिवाय राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीनंतर "नॉट रिचेबल' असल्याचे जाहीर केले. त्यात दिंडोरीचे नरहरी झिरवाळ आणि कळवणचे नितीन पवार यांचा समावेश आहे. 

Image may contain: 1 person, smiling, closeup

सरोज अहिरे

Image may contain: 1 person

नरहरी झिरवाळ

'नॉट रिचेबल'मध्ये पवार-झिरवाळ, तर ऍड. कोकाटे अन्‌ अहिरे पक्षासोबत 

शपथविधी सोहळ्यासाठी सिन्नरचे आमदार ऍड. माणिकराव कोकाटे आणि बनकर उपस्थित असल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले. राजभवनातील उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यासमवेत दिसलेल्या आमदारांबद्दल सोशल मीडियातून टीकेची झोड उठताच ऍड. कोकाटे पक्षासमवेत असल्याचा निर्वाळा कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी दिला. त्याच वेळी नाशिकमधून कार्यकर्त्यांनी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी पोचविले. राज्यातील राजकीय भूकंपावेळी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकींसाठी शरद पवार यांच्यासमवेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले. 

Image may contain: one or more people and people sitting

मुंबईहून परतल्यानंतर मुलाला पाहण्यासाठी बनकर हॉस्पीटलमध्ये
नाशिकमधील कौशल्य रुग्णालयात  बनकर यांचा मुलगा राहुल याच्यावर ऍपेंडेक्‍सची शस्त्रक्रिया झाली आहे. मुलाला पाहण्यासाठी मुंबईहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. बनकर म्हणाले, की सरकार लवकर स्थापन व्हावे, अशी भूमिका आमदारांची होती. पण सरकार कुणाबरोबर स्थापन करायचे हा पक्षाचा निर्णय आहे. पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत दहा दिवसांपूर्वी 54 आमदारांनी सह्या करून पत्र दिले होते. तेच पत्र अजित पवार यांनी राज्यपालांना दिले. मात्र शपथविधीचा निरोप नव्हता, तर आज सकाळी सातला धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी येण्याचा निरोप अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार गेलो होतो. राजभवनातून परतल्यावर पक्षाध्यक्षांशी तीन वेळा बोललो. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणे झाले. मुलाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितल्यावर पक्षाध्यक्षांनी नाशिकला जाऊन माध्यमांना माहिती देण्यास सांगितले. 
 
पवार कुटुंब फुटलेले नाही 
राजभवनात गेल्यावर "फ्लोअर टेस्ट' झाली का, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. बनकर यांनी त्याची माहिती आपणाला नसल्याचा निर्वाळा दिला. मग पवार कुटुंब फुटल्याची स्थिती तयार झाली असताना तुम्ही पक्षाध्यक्ष की दादांच्या समवेत आहात, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना बनकर म्हणाले, की पवार कुटुंब फुटलेले नाही. तसेच कुणाची दिशाभूल होण्याचा प्रश्‍न नाही. कुणी काय सांगावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. 
 
विमान तिकिटाच्या यादीत दोघांची नावे 
मुंबईहून दिल्लीला शनिवारी (ता. 23) दुपारी अडीचला दिल्लीकडे निघणाऱ्या विमानाच्या तिकिटाच्या यादीत झिरवाळ आणि पवार यांच्या नावाचा समावेश होता. प्रवाशांची यादी सोशल मीडियात व्हायरल झाली. त्याचे पडसाद बंडात सहभागी झालेल्या आमदारांच्या मतदारसंघातून सोशल मीडियातून उमटले. शिवराळ भाषेतून रोष मांडत असताना शरद पवारांमुळे विजयी झाल्याची आठवण करून देण्यात आली. मग मात्र ऍड. कोकाटे,  झिरवाळ, पवार, बनकर यांनी सोशल मीडियातून शरद पवारांच्या सोबत असल्याचा खुलासा केला. शरद पवारांनी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत ठोस भूमिका जाहीर करत राजभवनातून परतलेल्या तीन आमदारांना काय घडले याची माहिती सांगायला लावली. इथे बंडात सहभागी असलेल्यांच्या गोटातील अस्वस्थता शिगेला पोचली. दरम्यान, सरोज अहिरे यांच्या निवासस्थानी सकाळी नाशिक रोड व देवळाली कॅम्पचे पोलिस पोचले. पक्ष कार्यालयातून अहिरे यांना फोन आल्यानंतर दुपारी पोचल्या. इगतपुरी येथून कार्यकर्त्यांनी अहिरे यांच्या वाहनाला सुरक्षा देत त्यांना मुंबईत पोचविले. शपथविधीची घटना घडली असताना नितीन पवार इगतपुरीपर्यंतदेखील पोचले नसल्याचा निर्वाळा दिला गेला खरे. मात्र त्यांचा संपर्क रात्रीपर्यंत अनेकांना झालेला नाही. 

जयश्री पवार पोलिसांमध्ये तक्रार देण्याच्या मनःस्थितीत 
पती नितीन पवार यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्याची मनःस्थिती तयार केली. त्यासंबंधीची माहिती कळवण-सुरगाणा तालुक्‍यात पोचली होती. मग स्थानिकांनी कळवण आणि अभोणा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र "मिसिंग'ची तक्रार दाखल नसल्याची माहिती मिळाली. पतीचा संपर्क न झाल्यास पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सौ. पवार यांनी स्पष्ट केले. 

झिरवाळांबद्दल दत्तात्रय पाटलांना विश्‍वास 
नरहरी झिरवाळ पक्षाध्यक्षांसोबत असल्याचा विश्‍वास दिंडोरी बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांनी वर्तविला. ते म्हणाले, की झिरवाळ झोपलेले असताना त्यांना अजित पवार यांचा निरोप घेऊन आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या वाहनातून धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी नेले. राजभवनात गेल्यावर भाजपचा शपथविधी असल्याचे त्यांना समजले. "माझ्यावर विश्‍वास ठेवा, आपण सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करत आहोत,' असे अजित पवार यांनी सांगितले. वाहन नसल्याने झिरवाळ यांना अन्य ठिकाणी नेण्यात आले. सायंकाळी संपर्क झाला असून, त्यांनी पक्षासोबत असल्याचे सांगितले. 

फुटण्यासाठी गट स्थापन केलेला नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटलेला नाही. फुटण्यासाठी गट स्थापन केलेला नाही. नेत्यांमध्ये मतभेद असतील, नसतील याची माहिती नाही. पक्षनेतृत्वाने काय सांगितले याची आपणाला माहिती नाही. राजकीय घडामोडींबद्दल पक्षाध्यक्ष, अजित पवार, सुप्रिया सुळे हे विचार करतील. - दिलीप बनकर, आमदार, राष्ट्रवादी 
 
माझी पक्षविरोधी भूमिका नाही.

राजभवनात अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार गेलो. मात्र तेथे काय होणार याबाबत काही माहीत नव्हते. गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. मात्र आपली भूमिका पक्षविरोधी नाही. - ऍड. माणिकराव कोकाटे, आमदार, राष्ट्रवादी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The statement made by Dilip Bankar,s return to Sharad Pawar Political News Marathi News