दानवेंच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भाजप सरकार व दानवे यांचा निषेध करण्यात येत आहे. जळगाव, अकोला, उस्मानाबाद जिह्यांत शिवसेनेने दानवे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. "रस्ता रोको', "जोडे मारो' आंदोलनही केले

जळगाव - तूर खरेदीबाबत जालना येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी (ता. 10) शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. दानवे यांच्या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यातील विविध भागांत उमटले. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भाजप सरकार व दानवे यांचा निषेध करण्यात येत आहे. जळगाव, अकोला, उस्मानाबाद जिह्यांत शिवसेनेने दानवे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. "रस्ता रोको', "जोडे मारो' आंदोलनही केले.

मुक्ताईनगरमध्ये "रास्ता रोको'
मुक्ताईनगर (जि. जळगाव) ः शिवसेनेतर्फे "रास्ता रोको' करण्यात आला. दानवे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनही पोलिस निरीक्षकांना दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी दानवे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. रस्त्यावर वाहतूक रोखली. तसेच, दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला. पोलिसांनी हा पुतळा जप्त केला.

तोंडाला काळे फासण्याचा इशारा
अकोला - दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या. रावसाहेब दानवे जिल्ह्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी बसस्थानक चौकात दानवे व भाजपच्या विरोधात घोषणा देत दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून रोष व्यक्त केला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. 11) बसस्थानक चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दानवे यांच्या पोस्टरवरील चेहऱ्याला काळे फासले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

भूममध्ये "जोडे मारो'
भूम (जि. उस्मानाबाद) : दानवे यांच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ भूम शिवसेनेच्यावतीने आज दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला "जोडे मारो' आंदोलन केले. भूम शहरातील गोलाई चौकात शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश कांबळे व माजी नगरसेवक गणेश शेंडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.
 

Web Title: Statewide protest against Raosaheb Danve