पोलिस निरीक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अडविले संरक्षण राज्यमंत्र्यांचे वाहन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी एक वर्ष सटाणा पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळला होता. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळून जनतेशी सुसंवाद ठेवत कायदा आणि सुव्यस्था आबाधित ठेवले. असे असतांना पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याही तक्रारी व ठपका नसतांना अचानक त्यांची उचलबांगडी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सटाणा : येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांची अचानक झालेली बदली तात्काळ रद्द व्हावी, या मागणीसाठी तालुक्यातील दसाणे, केरसाणे, ब्राम्हणगावसह जुनी शेमळीच्या सरपंचासह ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे वाहन अडवून त्यांना साकडे घातले.

पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी एक वर्ष सटाणा पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळला होता. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळून जनतेशी सुसंवाद ठेवत कायदा आणि सुव्यस्था आबाधित ठेवले. असे असतांना पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याही तक्रारी व ठपका नसतांना अचानक त्यांची उचलबांगडी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत सर्वसामान्यांनी नाराजीची भावना देखील व्यक्त केली होती. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे बागलाणच्या दौऱ्यावर आले असता दसाणे येथील वसाकाचे माजी संचालक रामदास सोनवणे, दसाणे लघुप्रकल्पात बडून मरण पावलेल्या वैभव सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी पोलिस निरीक्षक पाटील यांच्या अचानक केलेल्या बदली बाबत नाराजी व्यक्त करत ही बदली रद्द करण्याची मागणी केली.

केरसाणे येथील इंदरसिंग थोरात व ग्रामस्थांनी तर जुनी शेमळी येथील सरपंच अमोल बच्छाव यांच्यासह ग्रामस्थांनी सटाणा - मालेगाव रस्त्यावर डॉ. भामरे यांचे वाहन अडवून पोलिस निरीक्षक पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. शहर व परिसरात शांतता नांदत असतांना अचानक श्री. पाटील यांची बदली करून त्यांच्यावर मोठा अन्याय करण्यात आला आहे. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी पाटील यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. डॉ. भामरे यांनी याबाबत चौकशी करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

 

Web Title: Stoped a vehicle of defence state minister for cancel the transfer of the police inspector