"आदिवासी विकास'च्या संचालक मंडळाची आज वादळी बैठक 

"आदिवासी विकास'च्या संचालक मंडळाची आज वादळी बैठक 

नाशिक - वर्षभर विविध वादग्रस्त खरेदी तसेच नोकरभरतीमुळे चर्चेत असलेल्या आदिवासी विकास महामंडळाच्या निर्वाचित संचालक मंडळाची वर्षभरात बैठकच झालेली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर झालेल्या "गोंधळा'ला मान्यता देण्यासाठी आज (ता. 28) घाईगर्दीत संचालक मंडळाच्या बैठकीचा घाट घालण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच गुरुवारी (ता. 29) महामंडळाची वार्षिक सभा होणार असल्याने संचालक मंडळात दोन गट पडण्याची शक्‍यता आहे. 

आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी, त्यावरील प्रक्रिया, त्याची वाहतूक, साठवणुकीतील अपव्यय, भरडाई याविषयी "कॅग'सह विविध यंत्रणांनी आक्षेप नोंदविलेले असताना नोकरभरतीची थेट विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असताना त्याचा कोणताही अधिकृत खुलासा प्रशासनाने केलेला नाही. मात्र, या सर्व प्रकरणांना कायदेशीर मुलामा देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या पूर्वसंध्येला उद्या घाईगर्दीत संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात या विषयांना मंजुरी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याची कुणकुण इतरांना लागू नये, म्हणून त्याची विषयपत्रिकाही गुप्त ठेवण्यात आली आहे. नियमानुसार पंधरा दिवस आधी विषयपत्रिका व त्यातील विषयांची सविस्तर माहिती संचालक मंडळाला दिली जाते. मात्र, वर्षभर संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. त्यातील मंजुरीशिवायच प्रशासनाने काम केले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सामान्य नागरिक नव्हे, खुद्द महामंडळाच्या संचालकांनाही अंधारात ठेवल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 

विषयांना संचालकांचा विरोध 
नोकरभरतीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना त्याला संचालक मंडळाची सहमती आवश्‍यक असते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. चौकशी सुरू असलेला विषय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्याची तरतूद नाही. तरीही नोकरभरतीचा मुद्दा विषयपत्रिकेत समाविष्ट केल्याने आज नाशिकला दाखल झालेल्या संचालकांनी त्याला विरोध असल्याचे पत्र आज कार्यकारी संचालकांना दिल्याने उद्याची बैठक वादळी ठरणार, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com