मोकाट कुत्र्यांप्रश्‍नी अभिनयासह आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

धुळे - शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा, डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने समाजवादी पक्षाने आज कार्यकर्त्याच्या माध्यमातून संताप व्यक्त करत महापालिकेत सहअभिनय आंदोलन केले. मोकाट कुत्री, डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पक्षाने केली. 

धुळे - शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा, डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याने समाजवादी पक्षाने आज कार्यकर्त्याच्या माध्यमातून संताप व्यक्त करत महापालिकेत सहअभिनय आंदोलन केले. मोकाट कुत्री, डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पक्षाने केली. 

शहरात ठिकठिकाणी मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, चावा घेऊन जखमी करण्याच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांसह वृद्ध, महिला-पुरुषांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच रात्री- अपरात्री कामावरून परतणाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांत औषधांचा कायमच तुटवडा असतो. त्यामुळे श्‍वानदंशानंतर उपचारासाठी शहरापासून सात किलोमीटरवरील सर्वोपचार रुग्णालयात जावे लागते. काही कारणांनी उपचार पूर्ण न झाल्यास जीवघेणा आजार बळावण्याची शक्‍यता असते. अशी गंभीर परिस्थिती असताना आणि या मोकाट, पिसाळलेल्या कुत्र्यांचा तसेच डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी वेळोवेळी मागणी केल्यानंतरही उपाययोजना होत नाही. या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, तोंडी सूचना न देता उपाययोजनांसाठी येत्या आर्थिक वर्षात स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, मालेगाव, नंदुरबार शहरांप्रमाणे यासाठी निविदा काढावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली. 

उपाययोजना न झाल्यास आपल्या दालनात कुत्री सोडू, असा इशाराही दिला. कुत्र्यांच्या या प्रश्‍नावर एका कार्यकर्त्याने सहअभिनाय आंदोलन करत समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रथम मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आयुक्त धायगुडे नसल्याने महापौर कल्पना महाले यांच्या दालनात जाऊन कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आकील अन्सारी, महासचिव जमील मन्सुरी, कार्याध्यक्ष अलमगीर शेख, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमीन पटेल, कल्पना गंगवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

महापौरांचे पती भडकले... 
समाजवादी पक्षाचे पदाधिकारी कुत्र्यांच्या बंदोबस्त मागणीप्रश्‍नी एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून सहअभियन आंदोलन करत महापौरांच्या दालनात गेले. त्यावेळी तेथे आलेल्या महापौरांच्या पतीने आंदोलनाचा प्रकार पाहिला. कुत्र्यांच्या आवाजात त्या कार्यकर्त्याचे ओरडणे, हावभाव प्रकार पाहून महापौरांच्या पतीचा संताप अनावर झाला. त्यांनी मर्यादेत राहून महिलांसमोर आंदोलने करावीत, असा सल्लाही दिला.

Web Title: Stray dogs issue