सटाण्यात मोकाट कुत्रे, डुक्कर व जनावरांचा धुमाकूळ

satanadogs
satanadogs

सटाणा : शहरात मोकाट कुत्रे, डुक्कर व जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. रात्री - अपरात्री तर या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मात्र पालिका प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही. याबाबत कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

शहरात मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांची एकूण संख्या किती, याची कल्पना पालिका प्रशासनाला नाही. शहरातील सर्व भागात या मोकाट प्राण्यांचा उपद्रव सुरु आहे. रस्त्यावरून पायी चालणारे पादचारी किंवा दुचाकीवरून जाणार्यांवर दबा धरून बसलेले कुत्रे अचानक हल्ला करतात. वाहनचालकाने या अचानक झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला तर त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुत्रे पळत सुटतात. त्यातच दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरते व अपघात होतो. या अपघातात रस्त्याने चालणाऱ्या निरपराध आबालवृद्धांवर जखमी होण्याची वेळ येते. अनेक नागरिक व वाहनचालकांना याचा चांगलाच अनुभव आहे. कुत्र्यांच्या टोळक्यामुळे पहाटे मोर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील मित्रनगर, साठ फुटी रोड, नामपूर रस्ता, भक्षी रोड, चौगाव रोड, भिवसन नगर, टेलिफोन कॉलनी, गणेश नगर, डेली व आठवडे बाजारात या मोकाट प्राण्यांचा हैदोस चाललेला असतो. मोकाट जनावरे तर थेट विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील चार फाटा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बसस्थानकासमोरील जागा तसेच समको बँक समोर व दोधेश्वर नाक्यावरील (कै.) पं.ध.पाटील चौकात ठिय्या देऊन महामार्गावर ठाण मांडून बसलेले असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांनाही ते घाबरत नाहीत. दिवसभर जनावरांचे हे ठिय्या आंदोलन सुरूच असते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होते.

या मोकाट जनावरांनी साठ फुटी रोडवरील डेली भाजीपाला बाजारातही धुमाकूळ घातला आहे. भाजी विक्रेत्यांसमोरील भाजीपाला जबरदस्तीने ओढून नेण्यात ही मोकाट जनावरे माहीर आहेत. भाजीपाला विक्रेत्याने अशा जनावरांना काठीचा धाक दाखवून हुसकाविण्याचा प्रयत्न केल्यास ती इतरत्र सैरावैरा पळू लागतात. त्यातच महिलांना या जनावरांचा उपद्रव सहन करावा लागतो.

ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी पालिकेने घंटागाड्या सुरु केल्या आहेत. मात्र काही नागरिक शिळे अन्न, उरलेली मटण, चिकनची हाडे घंटागाडीत न टाकता दररोज घरांसमोर मोकळ्या जागेत टाकत असतात. त्यावर डुकरे, मोकाट कुत्री व जनावरे तुटून पडतात. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर ते हल्ला करतात. मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नववसाहती व जुन्या शहरातील गल्लीबोळात मोकाट डुकरे व कुत्रे नागरिकांच्या घरासमोर किंवा बाजूला तुंबलेल्या गटारींमध्ये लोळत असल्याने रोगराई पसरली आहे. एकूणच या मोकाट प्राण्यांमुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com