नाशिक शहरात ऑन- ऑफ स्ट्रीट पार्किंगचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

‘एआर’अंतर्गत पार्किंग शोधणार
शहरातील वाढत्या वाहतुकीवर उपाय म्हणून ऑन स्ट्रीट पार्किंग उभारण्यात आले. त्याव्यतिरिक्त ‘एआर’अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या पार्किंगचा विचार केला जाणार आहे. शहरात आतापर्यंत ‘एआर’अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या पार्किंग शोधण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. ते पार्किंग खासगी एजन्सीला चालविण्यास दिले जाणार आहे.

नाशिक - स्मार्ट सिटींतर्गत शहरात सोमवार(ता. १)पासून पंधरा ठिकाणी ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंगला सुरवात झाली. पंधरा दिवस मोफत, त्यानंतर मात्र नाममात्र दर आकारला जाणार आहे. ज्या भागात पार्किंगचे लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यावर पार्किंगसाठी जागा शिल्लक आहे की नाही येथून ते पार्किंगसाठी जागा बुक करण्यापर्यंतची सुविधा उपलब्ध राहील.

स्मार्टसिटींतर्गत शहरातील पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. पीपीपी तत्त्वावर स्मार्ट पार्किंगचा प्रकल्प राबविला जात आहे. त्याची सुरवात सोमवारपासून झाली. पहिले पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर मोफत पार्किंग राहील. त्यानंतर मात्र दुचाकीसाठी प्रतितास दहा रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी प्रतितास २० रुपये दर आकारला जाणार आहे. ट्रिगिन टेक्‍नॉलॉजीज्‌ प्रा. लि.तर्फे ३३ ठिकाणच्या स्मार्ट पार्किंगचे व्यवस्थापन केले जात आहे. यात २८ ऑन स्ट्रीट, तर ५ ऑफ स्ट्रीट पार्किंग राहील. पहिल्या टप्प्यात सोमवारपासून १५ पार्किंगचे लॉट उपलब्ध करण्यात आले असून, उर्वरित १८ लॉट टप्प्याटप्याने कार्यान्वित केले जाणार आहेत. १५ पार्किंगच्या माध्यमातून दोन हजार १९० दुचाकी व ९८६ चारचाकी वाहनांची व्यवस्था लावली जाणार आहे. स्मार्ट पार्किंगसाठी कंपनीच्या वतीने ॲप विकसित करण्यात आले आहे. निवडक ठिकाणी पार्किंगसाठी किती जागा शिल्लक आहे, असल्यास त्या जागा पोचण्यापूर्वी बुक करता येणार आहेत. पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यांवर सेन्सर व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

पार्किंगची ठिकाणे
  येथे ऑन स्ट्रीट पार्किंग (वाहनांची क्षमता)
  शरणपूर रोड, कुलकर्णी गार्डन (२६)
  कॅनडा कॉर्नर बीएसएनएल कार्यालय (६६)
  ज्योती स्टोअर्स, गंगापूर नाका (२४०)
  प्रमोद महाजन उद्यान, गंगापूर रोड (८३)
  गंगापूर नाका ते जेहान सर्कल (५९३)
  जेहान सर्कल ते गुरुजी रुग्णालय (१६५)
  जेहान सर्कल ते एबीबी सर्कल (७८७)
  गुरुजी रुग्णालय ते पाइपलाइन रोड (७९)
  मोडक पॉइंट ते खडकाळी रोड (७८)
  थत्तेनगर (१६४)
  शरद पेट्रोलिअम ते वेस्टसाइड (२१७)
  कॅनडा कॉर्नर ते विसे मळा (११६)
  शालिमार ते नेहरू गार्डन (१०५)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On-Off Street Parking in Nashik City Smart City