"मेक इन नाशिक'द्वारे विकासाला बळकटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

सातपूर - गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आलेला नाही. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. नवीन रोजगारनिर्मितीसाठी, शहराच्या विकासासाठी नव्याने गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी "मेक इन नाशिक'सारखे उपक्रम नाशिकला औद्योगिक व आर्थिक बळकटी देणारे ठरतील, असा विश्‍वास महापौर रंजना भानसी यांनी व्यक्‍त केला. 

सातपूर - गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आलेला नाही. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. नवीन रोजगारनिर्मितीसाठी, शहराच्या विकासासाठी नव्याने गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी "मेक इन नाशिक'सारखे उपक्रम नाशिकला औद्योगिक व आर्थिक बळकटी देणारे ठरतील, असा विश्‍वास महापौर रंजना भानसी यांनी व्यक्‍त केला. 

"मेक इन नाशिक' उपक्रमाच्या आढावा बैठकीसाठी निमा भवनात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, नगरसेवक शशिकांत जाधव, दिनकर पाटील, रवींद्र धिवर, डॉ. हेमलता पाटील, वर्षा भालेराव, कोमल मेहरोलिया, उदय खरोटे उपस्थित होते. 

महापौर भानसी म्हणाल्या, की शहराने भविष्याचा वेध घेत विकासाकडे वाटचाल केली असून, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. मेक इन नाशिकसारखे उपक्रम विकासाला नवी दिशा देणारे असून, त्यासाठी उद्योजकांसह शहरातील नागरिकांनीही त्याचे ब्रॅन्डिंग करावे. 

श्री. बॅनर्जी यांनी मेक इन नाशिक उपक्रमाविषयी माहिती देत नाशिककरांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. सातपूर प्रभागाच्या सभापती माधुरी बोलकर, नगरसेविका वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, उद्योजक संदीप भदाणे, सुरेश माळी, मंगेश काठे, श्रीकांत बच्छाव आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याकडे लक्ष 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (ता. 28) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांची भेट घेऊन उद्योगक्षेत्राला चालना देण्यासाठी विशेषत: आयटी क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा केली जाईल, असे महापौर भानसी यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन उपाययोजना करत असून, लवकरच ड्रेनेजच्या प्रश्‍नासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे आश्‍वासनही या वेळी दिले. 

आमदारांसोबत आज बैठक 
मेक इन नाशिक उपक्रमाविषयी माहिती देण्यासह सूचना जाणून घेण्यासाठी उद्या (ता. 23) सायंकाळी पाचला निमा भवनात आमदारांची बैठक होणार आहे. 

मेक इन नाशिकच्या निमित्ताने मोठा उद्योग नाशिकमध्ये यावा, यासाठी सर्व नगरसेवकांचे शिष्टमंडळ महापौर व पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मेक इन नाशिक प्रदर्शनाचे सुमारे 40 बॅनरही लावणार आहे. 
- दिनकर पाटील, नगरसेवक 

नाशिकमधील युवकांत कुशलता असूनही त्यांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, बेंगळुरू आदी ठिकाणी जावे लागते. या उपक्रमातून मोठा उद्योग नाशिकमध्ये आल्यास बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल. 
- शशिकांत जाधव, नगरसेवक 

औद्योगिक विकासात वाढ होत नसल्याने अपेक्षेप्रमाणे रोजगारनिर्मिती होत नाही. नोकरीसाठी शहराबाहेर जाणाऱ्या मुलांना शहरात रोखायचे असेल, तर औद्योगिक विकासाला चालना दिली पाहिजे. 
- कोमल मेहरोलिया, नगरसेविका 

Web Title: Strengthened development through Make in Nashik