सटाण्यात संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगणक परिचालकांना आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाही.

- राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणार्‍या हजारो संगणक परिचालकांनी आज बुधवार (ता.२८) बागलाण पंचायत समितीसमोर शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडले.

सटाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगणक परिचालकांना आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाही. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर ‘आपले सरकार’ प्रकल्पात काम करणार्‍या हजारो संगणक परिचालकांनी आज बुधवार (ता.२८) बागलाण पंचायत समितीसमोर शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत धरणे आंदोलन छेडले.

दरम्यान, संगणक परिचालकांच्या या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. याबाबत बागलाण तालुका संगणक परिचालक संघटनेतर्फे तहसिलदार जितेंद्र इंगळे आणि गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना दिलेल्या निवेद दिले होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून ‘संग्राम’ व सध्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती मधील संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत आहेत. हे काम करताना ग्रामीण भागातील जनतेला दाखले, प्रधानमंत्री किसान योजना, श्रमयोगी योजना, पीक विमा योजना, शौचालय अपलोडिंग, प्रधानमंत्री आवास योजना, अस्मिता योजना या व्यतिरिक्त महाऑनलाईनची कामे, ग्रामसभा, मासिक सभा, गाव विकास आराखडे यांसह ग्रामपंचायत सांगेल ती कामे संगणक परिचालक करीत असतो. तरीही या संगणक परिचालकांना वेळेवर मानधन मिळत नाही.

सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला मानधन दिले जात नाही. मात्र या सर्व मागण्या प्रलंबित असल्याने आणि पाठपुरावा करूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व तालुकास्तरावर संगणक परिचालक आजपासून धरणे आंदोलन करीत आहेत.

शासनाने संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, १५ हजार रुपये किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकीत असलेले मानधन तात्काळ घ्यावे, यांसह विविध मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शासनविरोधात आमचा लढा सुरूच राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल पाटील, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितिन सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

आंदोलनात तालुकाध्यक्ष पोपट पवार, उपाध्यक्ष अभिषेक काकडे, सचिव गजानन ठाकरे, सल्लागार प्रमोद सावंत आदींसह संघटनेचे संगणक परिचालक बहुसंख्येने सहभागी होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strike of computer operators in Satna