आदिवासी भागात विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची पायपीट

खंडू मोरे
शनिवार, 5 मे 2018

कसमादे भागातील नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड या भागात आदिवासी विकास विभागाच्या व खाजगी संस्था चालकांच्या अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा आहेत.

खामखेडा : कसमादे भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या निवासी आश्रमशाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांमध्ये विद्यार्थी शोधण्याची स्पर्धा लागली. संस्थाचालक व व्यवस्थापनाकडून पहिली व पाचवीच्या व इतर इयत्तासाठी नवीन विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट शिक्षकांना देण्यात येत असल्याने या शाळांमधील शिक्षकांची शाळांना सुट्ट्या लागताच आदिवासी भागात पायपीट सुरु झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

कसमादे भागातील नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड या भागात आदिवासी विकास विभागाच्या व खाजगी संस्था चालकांच्या अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी हे अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त या प्रवर्गातील असल्याने देशी व शाळा असलेल्या भागात या संवर्गातील मुलं सहसा मिळत नाहीत. या संवर्गातील विद्यार्थी मिळणे हे प्रत्येक शाळांसाठी तारेवरची कसरत असते.

ही लाभार्थी संवर्गातील विद्यार्थी हे आदिवासी तालुक्यांमध्ये अधिक असतात आणि या भागातील शाळांनी लवकर ही मुलं दाखल केली तर कसमादे भागातील शाळांना लाभार्थी विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे सध्या शाळांना व शिक्षकांना सुट्ट्या लागल्या असून या शाळा व संस्थांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या टिकावी व शाळा सुरु रहाव्यात यासाठी शिक्षकांनाच विद्यार्थी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात विद्यार्थी शोधमोहिमेसाठी पिटाळले आहेत.

शाळा आणि शिक्षक टिकण्यासाठी विद्यार्थी हवे आहेत. म्हणून संस्थाचालक व शाळा व्यवस्थापनदेखील शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर पाठवत आहेत. नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, साक्री, चाळीसगाव या भागातील शिक्षक शाळांना सुट्ट्या लागताच कळवण, दिंडोरी, सुरगाणा या भागात विद्यार्थी शोधण्यासाठी फिरू लागले आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना भेटत आपल्या पाल्यासाठी आमची शाळा कशी चांगली आहे हे पटवून देत प्रवेश निश्चित करत आहेत.

पालकांचे मत परावर्तित करण्यासाठी विद्यार्थी मिळविताना शिक्षकांना मात्र कसरत करावी लागत आहे़. संस्थाचालक मात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळेवरील शिक्षकांनाच जुंपत असून, प्रत्येक शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्याचे टार्गेट दिले जात आहे. आदिवासी तालुक्यातील  पालकांशी संवाद साधताना शिक्षक दिसून येत आहेत़.

आदिवासी बहुल भागात देखील मराठी शाळांचा दर्जा वाढला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन केले जाऊ लागल्याने आपल्या गावातच आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने अनेक पालक स्थानिक शाळांची स्तुती शिक्षकांना सांगू लागले आहेत. त्यामुळे पालकांचे मत परिवर्तन करताना या भागात शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.
 

Web Title: Students gets Huge Problesms for education