विद्यार्थ्यांच्या "सेल्फी'वर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

धुळे - शिक्षण विभागाच्या दर सोमवारी विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्याच्या आदेशावर माध्यमिक विभागाच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी बहिष्कार टाकावा, असा निर्णय धुळे जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. कोणीही "सेल्फी' काढू नये, असे आवाहन समितीने केले आहे. शिक्षकांना आधीच्याच कामात हे एक काम आल्याने "सेल्फी'चा निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा ठरणार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

धुळे - शिक्षण विभागाच्या दर सोमवारी विद्यार्थ्यांची सेल्फी काढण्याच्या आदेशावर माध्यमिक विभागाच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी बहिष्कार टाकावा, असा निर्णय धुळे जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. कोणीही "सेल्फी' काढू नये, असे आवाहन समितीने केले आहे. शिक्षकांना आधीच्याच कामात हे एक काम आल्याने "सेल्फी'चा निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा ठरणार असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाने तीन नोव्हेंबरला आदेश काढत राज्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये दर सोमवारी दहा विद्यार्थ्यांचा गट करून त्यांची शाळेतील सर्व शिक्षकांसोबत "सेल्फी' काढून त्याच दिवशी "ऑनलाइन अपलोड' करण्याचा आदेश काढला आहे. प्रत्येक दिवशी ऑनलाइन विद्यार्थी संख्या कळवावी हा त्यामागचा उद्देश आहे. या संदर्भात समन्वय समितीने चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलविली होती. राज्यातील प्रत्येक शाळेचा विचार करता आदिवासी, दुर्गम भागातील तसेच अपुरे तंत्रज्ञान व प्रत्यक्ष अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येतात. शिवाय यात मुलींची छायाचित्रे येणार असल्याने पालकांचाही विरोध आहे. या अडथळ्यांचा विचार करता दैनंदिन अध्यापनात आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर याचा फार मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे "प्रगत अध्ययन शैक्षणिक महाराष्ट्र' या उपक्रमावर दुष्परिणाम होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

"सेल्फी' काढू नका
"सेल्फी'बाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या जाचक अडचणींचा विचार करता कोणीही विद्यार्थ्यांची "सेल्फी' काढू नये. या उपक्रमात कोणत्याही शाळेने, मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी सहभागी होऊ नये, बहिष्कार टाकावा, असे आवाहन धुळे जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समिती, मुख्याध्यापक संघ व सर्व शिक्षक संघटनांनी केल्याचे समितीचे समन्वयक संजय पवार यांनी म्हटले आहे.
बैठकीला शिक्षक परिषद, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, ओबीसी शिक्षक सेल, क्रीडाशिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र कलाध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ, शिक्षक आमदार अपूर्व हिरेप्रणीत माध्यमिक शिक्षक समिती, विनाअनुदानित शिक्षक कृती समिती, उर्दू शिक्षक संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

"सेल्फी'सोबतची माहिती
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दर सोमवारी दहा विद्यार्थ्यांचा एकेक गट करून त्यांचा "सेल्फी' शिक्षकाने काढावी, त्या "सेल्फी'त उपस्थित असलेल्या मुलांची नावे आणि त्यांचा आधार क्रमांक सोबत द्यावा. ही माहिती शिक्षण विभागाच्या प्रणालीत अपलोड करावी, असे आदेश आहेत. हजर असलेले किंवा "सेल्फी'तील विद्यार्थी रोज बदलतील, मग तोच डेटा पुन्हा ऑपरेट करावा. नेट उपलब्ध नसल्यास तो अपलोड होईपर्यंत वाट पाहावी. ही सर्व प्रक्रिया शिक्षकाला स्वतःच्या मोबाईलने करायची आहे, हे विशेष.
 

Web Title: students selfie ban