Kerala Floods : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आदिवासी भागातील विद्यार्थीही सरसावले

दिगंबर पाटोळे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आदिवासी भागातील जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थी सरसावले असून भातोडे येथील जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून दोन हजारांचा निधी जमा केला आहे. 

वणी (नाशिक) : केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आदिवासी भागातील जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थी सरसावले असून भातोडे येथील जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून दोन हजारांचा निधी जमा केला आहे. 

केरळ राज्यात पावसाने थैमान घालून अवघे केरळ राज्य पूरामुळे उध्वस्त झाले. करोडोची हाणी व सुमारे चारशे केरळीबांधव यात मृत्युमुखी पडले, लाखो कुटुंबाचे संसार उध्वस्त होवून रस्त्यावर आलीत. यासर्वांना मदतीचा हात देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. याभावनेतून दिंडोरी तालुक्यातील एसटी बसही न पोहचलेले आदिवासी गाव असलेल्या भातोडे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ता. 25 रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुरग्रस्तांना मदत म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठी जमा केलेले पाच, दहा, वीस, पन्नास रुपये याप्रमाणे दोन हजार रुपये पुठ्याच्या बनवलेल्या पुरग्रस्त मदत पेटीत टाकत जमा केली आहे.

सदरचा उपक्रम राबविण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ महाले यांनी पुढाकार घेतला. सदरचा दोन हजारचा निधी सकाळ माध्यम समुहाच्या सकाळ रिलीफ फंडा मार्फत केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला पाठविण्यात येणार असून वणीचे सकाळचे बातमीदार दिगंबर पाटोळे यांच्याकडे दोन हजारांची रक्कम शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ महाले, मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांनी सुपूर्त केला. याकामी पोलिस पाटील विजय राउत, जयराम कुवर, शाळेचे शिक्षक बाळू काकूळते, संजय चौरे,  शिवाजी उशिर, ज्योती आहिरे, चंद्रकात शिंदे  आदींचेही सहकार्य लाभले.

Web Title: Students from tribal areas also came to help the kerala