पैशांच्या जोरावर मिळवलेल्या यशाची भाजपला गुर्मी

bjp
bjp

जळगाव - नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो जनतेला मान्य असल्याचा बागुलबुवा उभा केला जात आहे. याचे विवेचन करण्याची गरज आहे. पैशांच्या जोरावर "भाजप'ने पालिका निवडणुकीत यश मिळविले. यामुळे त्यांना सत्तेची गुर्मी आली आहे, ते मस्तीत आहेत. पैशांच्या जोरावर आम्ही निवडून येऊ शकतो, अशी गुर्मी भाजपला आहे, असा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मिर्लेकर यांनी आज येथे केला. सोबतच भाजपला आलेली सत्तेची गुर्मी जनता जनार्दनापर्यंत पोचविण्याचे काम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्यास, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जनता त्यांची (भाजप) मस्ती जिरवेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांच्या बंगल्यावर आज शिवसेनेची बैठक झाली. त्यात ते मार्गदर्शन करीत होते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्कप्रमुख के. पी. नाईक, सहसंपर्कप्रमुख विलास पारकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सोमवंशी, सदस्या इंदिराताई पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

मिर्लेकर म्हणाले, की पैशांच्या जोरावर भाजपने नगरपालिका निवडणुकीत विजय मिळविला. जनता विकावू आहे हे त्यांनी जुन्या नोटा खपवून दाखवून दिले. जनता त्यांना उत्तर देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पालिका निवडणुकांत झाले ते झाले. मात्र झालेल्या पराभवाची पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चीड आली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या 67 गटांपैकी 40 ते 50 गटात आपले उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

सेनेचे मुस्लिम भाजपला नको
सहकार राज्यमंत्री पाटील म्हणाले, की भाजपला जम्मू काश्‍मीरमध्ये "पीडीपी'ची युती चालते, मात्र शिवसेनेतील मुस्लिम चालत नाही. मात्र शिवसेनेकडचे पटेल त्यांना चालत नाही. त्यांच्याकडे नगराध्यक्षपदाचे असलेले उमेदवार "दत्तक' घेतलेले आहेत. आपल्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत इच्छुक भरपूर आहेत.

साम-दाम दंड भेद वापरा
एका ठिकाणाहून अधिक उमेदवार असतील तर सर्वांनी एकत्र येऊन एकच उमेदवार द्या. त्याला निवडून आणा. सर्वांनी प्रयत्न करा. सावधानतेने लढा. साम, दाम, दंड, भेद वापरून लढा. मात्र आपल्याच उमेदवाराला पाडण्यासाठी कारस्थान रचू नका. या निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार कराच व कामाला लागा, असे आवाहन पाटील यांनी केले. प्रा. उत्तम सुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले.

पाच गटांचे उमेदवारही घोषित
रावेर तालुक्‍यातील निंभोरा तांदलवाडी गटात भास्कर विठ्ठल पाटील, पाचोरा तालुक्‍यातील पिंपळगाव-शिंदाड गटात उद्धव मराठे, नगरदेवळा-बाळद गटात रावसाहेब पाटील, लोहटार खडकदेवळा गटात- वंदृावली महेश सोमवंशी, लोहारा कुऱ्हाड गटात-रेखा दीपक राजपूत यांना आजच्या बैठकीत संपर्कप्रमुख मिर्लेकर यांनी उमेदवारी जाहीर केली.

माजी जि.प.अध्यक्ष तडवींचा शिवसेनेत प्रवेश
कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले उखर्डू तडवी यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला. राष्ट्रवादीचे रावेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com