Dhule News: धनदाई देवी यात्रोत्सवाची म्हसदीत जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News:

Dhule News: धनदाई देवी यात्रोत्सवाची म्हसदीत जय्यत तयारी

म्हसदी : येथील ७७ पेक्षा अधिक कुळांची कुलदेवता असलेल्या धनदाईदेवीचा यात्रोत्सव‌ यंदा चैत्र दुर्गा अष्टमी २९ मार्चपासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त धनदाईदेवीजवळ लाखो भाविक दर्शन व नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात. अमरावती नदीपात्रात यात्रेनिमित्त विविध व्यावसायिक दुकाने थाटण्यात येत असून तरुण तरुण ऐक्य मंडळातर्फे जय्यत तयारी सुरू आहे.

देवीची यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. राज्यासह मध्य प्रदेश व गुजरातमधून दर्शन, नवसपूर्तीसाठी लाखो भाविक हजेरी लावतात. देवीजवळ नवसपूर्तीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी तरुण ऐक्य मंडळ सज्ज असल्याची माहिती धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, कोशाध्यक्ष उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने दिली.

भाविकांना पिण्याचे पाणी, नवसपूर्तीसाठी जागा व इतर सुविधा धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे दिल्या जातात. तरुण ऐक्य मंडळाने भाविकांची देणगी व शासनाच्या निधीतून मंदिर परिसराचा कायापालट केला आहे.

दिवे लावून नवसपूर्ती

नवसपूर्तीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी - सुविधांसाठी तरुण ऐक्य मंडळाचे प्रयत्न असतात. नवसपूर्तीनंतरच्या भोजन व विश्रामासाठी मंडळाच्या चार एकर जागेवर वनराई साकारली आहे. शिवाय १५ पत्र्याची शेड नवसपूर्तीसाठी उपलब्ध आहेत. यापूर्वीच तरुण ऐक्य मंडळाने मंदिराजवळ दोन मजली मंगल कार्यालय उभारले आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

सो‌‌यी सुविधांमुळे वाढती गर्दी

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने भाविकांना दिलेल्या विविध सुविधांमुळे दरवर्षी येणारी गर्दी वाढत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. आठवडाभर चालणाऱ्या यात्रोत्सवात राज्यभरातील देवीला कुलदैवत मानणारे भाविक हजेरी लावतात. दरवर्षी रणरणत्या उन्हात यात्रा असते. भाविकांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन तरुण ऐक्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

''धनदाईदेवी मंदिराजवळ दरवर्षी गर्दी वाढतीच असल्याने चैत्र अष्टमीच्या यात्रोत्सवात भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत नवसपूर्ती करावी. मंदिर प्रशासनास सहकार्य करावे.'' -सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी.