बागलाणमध्ये शेती पंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी व शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आज गुरुवार (ता.६) कार्यकारी अभियंता अनिल उईके यांना घेराव घालून तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, येत्या (ता. ११) डिसेंबर पर्यंत वीज पुरवठाच्या वेळात बदल करण्याचे लेखी आश्वासन उईके यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. कंपनीने शेती सिंचनासाठी तालुक्यात दिवसा थ्री फेज तर, शेतशिवारात सिंगल फेज वीजपुरवठा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आला आहे. 

आज दुपारी संतप्त झालेले शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मालेगाव रस्त्यावरील वीज महावितरणच्या कार्यालयात घोषणाबाजी करत दाखल झाले. यावेळी माजी आमदार चव्हाण, तालुकाध्यक्ष सूर्यवंशी व शहराध्यक्ष सोनवणे यांनी कार्यकारी अधिकारी उइके यांना घेराव घातला. यावेळी माजी आमदार चव्हाण म्हणाले,''बागलाण  तालुका शासनाने दुष्काळी जाहीर केलेला आहे. तालुक्यात शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी उपलब्ध असून त्यावर शेतकर्‍यांना शेती सिंचनासह गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने जंगलातील पाण्याचे साठे आटत चालले असून बिबट्यासारखे हिंस्त्र श्वापदे शेती वस्त्यांवर चाल करून येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. शेती शिवारात रात्री पूर्ण वेळ सिंगल फेज वीजपुरवठा मिळणे गरजेचे आहे. तसेच उपलब्ध पाणी सिंचनासाठी वापण्याकरीता शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतीस पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे या वेळांमध्ये तातडीने बदल होणे गरजेचे असल्याचे '' चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

आंदोलनात पालिकेचे गटनेते काकाजी सोनवणे, बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, पंडितराव अहिरे, भारत खैरणार, किरण पाटील, अमोल खैरणार, जिभाऊ सोनवणे, डॉ. सतीश शेवाळे, धर्मेंद्र सोनवणे, राजेंद्र रौदळ, नितिन सोनवणे, बाळकृष्ण ठोके, रणजीतसिंग ठाकरे, भास्कर सोनवणे, बाळासाहेब देवरे, अभिजीत निकम, सुभाष पाटील, वैभव सोनवणे, लोटण जाधव, मनोज निकम, सिताराम बच्छाव, बापू मोरे, ताराचंद मोरे आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी होते.

Web Title: A sudden change in the time of power supply of agricultural pumps in Baglan