जळगाव-उधना दुहेरी रेल्वेमार्ग जूनपर्यंत कार्यान्वीत 

जळगाव-उधना दुहेरी रेल्वेमार्ग जूनपर्यंत कार्यान्वीत 

जळगाव - पश्‍चिम रेल्वेमार्गावरील जळगाव ते गुजरातमधील उधना स्थानकापर्यंत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जूनपर्यंत हा मार्ग कार्यान्वीत होईल. शिवाय, नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या नवीन रेल्वेमार्गांसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीतून सर्वेक्षण व त्यासंबंधीच्या विस्तृत अहवालाचे काम झाल्याने या मोठ्या कामांनाही चालना मिळणार आहे. रेल्वेस्थानकांवरील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विभागात दोन ठिकाणी पाण्याच्या पुनर्वापराचे पन्नास लाख लिटर क्षमतेचे दोन प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे भुसावळ मंडल प्रबंधक तथा "डीएमआर' सुधीरकुमार गुप्ता यांनी दिली. 

"सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयात आयोजित "कॉफी विथ सकाळ' उपक्रमांतर्गत ते बोलत होते. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मेश्राम, जनपसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यावेळी उपस्थित होते. निवासी संपादक विजय बुवा यांनी श्री. गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर श्री. गुप्ता यांनी भुसावळ विभागांतर्गत रेल्वेशी संबंधित सुविधा, भविष्यातील विकासविषयक योजनांबाबत दिलखुलास चर्चा केली. 

इंजिनिअरिंग ते अधिकारी 
सुरवातीला गुप्ता यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल सांगितले. मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी, वडील न्यायव्यवस्थेत अधिकारी. घरात तीन भावंडे. त्यापैकी थोरले अधिकारी, मधले बंधू डॉक्‍टर झाले. त्यामुळे धाकट्याने इंजिनिअर व्हावे, अशी कुटुंबीयांची इच्छा. वडील अधिकारी असल्याने दर तीन वर्षांनी त्यांची बदली व्हायची. त्यामुळे त्यावेळच्या अकरावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण सात वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. नववी ते अकरावी मध्य प्रदेशातील शायापूर येथील शाळेत पूर्ण करत एनआयटी, भोपाळ येथून त्यांनी अभियांत्रिकीची (सिव्हिल) पदवी प्राप्त केली. प्रशासकीय सेवेची आवड असल्याने त्यांनी "यूपीएससी'चा अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळविले व रेल्वेत अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. "सहाय्यक इंजिनिअर' या पदापासून सुरवात करत ते मंडल रेल्वे प्रबंधक या पदापर्यंत पोहोचले. 

दोन वर्षांत अपघातांवर नियंत्रण 
भुसावळ विभागात "डीआरएम' म्हणून गुप्ता यांनी दोन वर्षे नुकतीच पूर्ण केली. त्याबद्दल ते म्हणाले, की या विभागातील अनुभव चांगला राहिला. भुसावळ विभागात विविध विभागांची टीम चांगली व सहकार्य करणारी आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही विभागांतर्गत रेल्वे अपघातांवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण मिळविले. रेल्वे फ्रॅक्‍चर, ट्रॅक दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वॅगन व कोचमधील बिघाड या कारणांमुळे रेल्वेचे अपघात घडतात. मात्र या प्रत्येक क्षेत्रावर काम करून, तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग करत आम्ही अपघात कमी केले. 

केळीला सवलत धोरणात्मक निर्णय 
केळी वाहतुकीसाठी वॅगन्सची समस्या आधी मोठ्या प्रमाणात होती. परंतु गेल्या काही वर्षांत तुलनेने केळीचे उत्पादन जिल्ह्यात कमी झाले आहे. देशातील अन्य प्रांतातही केळीचे उत्पादन होऊ लागल्याने जळगाव जिल्ह्यातून वाहतुकीचे प्रमाणही त्यामुळे कमी झाले आहे. शिवाय वाहतुकीचे अन्य पर्यायही उत्पादकांकडे उपलब्ध आहेत. वाहतूकदरात 25 टक्के सवलतीची उत्पादकांची मागणी आहे, मात्र त्याचे अधिकार मला नसून तो धोरणात्मक निर्णय रेल्वे मंत्रालयच घेऊ शकेल. गेल्या काही वर्षांत कांदा, मका वाहतुकीचे प्रमाण बऱ्यापैकी वाढल्याचे गुप्ता म्हणाले. 

क्षमता 100 ची, 115 गाड्यांचे आवागमन 
दहा-वीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता मालगाड्यांसह प्रवासी गाड्यांची संख्या वाढली आहे. मात्र, तरीही वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता ही संख्या कमी पडते. त्यामुळे मालगाड्यांबरोबरच प्रवासी गाड्यांची संख्या, वॅगन्स व कोचेसची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी स्वाभाविक आहे. परंतु त्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्‍चर) उपलब्ध नाहीत. सध्याच्या सुविधेनुसार दिवसभरात साधारण 100 गाड्यांचे आवागमन होईल, एवढी क्षमता आहे. त्यावर आजमितीस 115 गाड्या धावत आहेत. त्यामुळे अतिरिक्त रेल्वेमार्ग, त्यांचे मजबुतीकरण, यार्डांचा विकास या सुविधा उपलब्ध झाल्यास गाड्यांची संख्या वाढविली जाऊ शकते. 

स्थानकांवर सुविधा, "मॉडेल स्टेशन' नाहीच 
काही वर्षांपूर्वी "मॉडेल स्टेशन' संकल्पना आली होती, त्याबद्दल विचारले असता गुप्ता म्हणाले, की उत्पन्नानुसार स्थानकांना ए-1, ए, बी व सी असा दर्जा दिला जातो. सध्या भुसावळ विभागात नाशिक हे एकमेव "ए-1' दर्जाचे स्थानक आहे, तर जळगावसह भुसावळ, मनमाड, चाळीसगाव, खंडवा, बऱ्हाणपूर, अकोला, शेगाव, बडनेरा आदी "ए' दर्जाची स्थानके आहेत. "मॉडेल स्टेशन' ही संकल्पना बाद झाली असली तरी स्थानकाच्या दर्जानुसार त्याचा विकास करण्याचे काम सुरू आहे. जळगाव स्थानकावर लिफ्टची सुविधा करण्यात येत असून लवकरच ती कार्यान्वीत होईल. 

पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प 
गेल्या वर्षापूर्वी राज्यात व देशात दोन वर्षे दुष्काळ पडला होता. त्याचा परिणाम म्हणून भुसावळ विभागातील सर्वच स्थानकांवर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, मनमाड यासारख्या स्थानकांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य होते. त्यावर पर्याय काढणेही कठीण असताना आम्ही गेल्या दोन वर्षांत पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार भुसावळ स्थानकावर 40 लाख लिटर, तर मनमाड स्थानकावर 10 लाख लिटर क्षमतेचा पाणी पुनर्वापर प्रकल्प तयार होत आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक स्थानकांवर पादचारी दादऱ्याची दुरुस्ती (foot over bridges), प्लॅटफॉर्म दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 

नाशिक-पुणे, मनमाड-इंदूर मार्गाला चालना 
रेल्वे मंत्रालयाने 265 किलोमीटरच्या नाशिक-पुणे नव्या रेल्वेमार्गासाठी 225 कोटी, व मनमाड-इंदूर या 368 कि. मी. मार्गासाठी 150 कोटी रुपये नुकतेच मंजूर केले आहेत, त्यात या रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण, त्यासंबंधीचा अहवाल आदी कामे मार्गी लागतील. नंतर भूसंपादन व प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया सुरू होईल. या मार्गांना अद्याप दीर्घ कालावधी असला तरी कामांना चालना मिळाली, हे महत्त्वाचे आहे. जळगाव-उधना दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे, ते जूनपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग कार्यान्वीत होईल. भुसावळ-जळगाव तिहेरी रेल्वेमार्गाचे कामही सुरू असून त्याला वर्ष लागेल. 

रेल्वे गुन्हेगारीवर नियंत्रण 
रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात विचारले असता श्री. गुप्ता यांनी त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा केला. मोबाईल, दागिने चोरी, महिलांची छेडखानी, हाणामारीचे प्रकार आदी गुन्हे घडतात. त्यावरील नियंत्रणासाठी रेल्वेचे स्वतंत्र रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि स्थानिक पोलिस या तीन यंत्रणा काम करतात. या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तिघा यंत्रणांमध्ये समन्वयाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात, चालत्या रेल्वेत वाढीव "आरपीएफ' तसेच स्थानकांवर पोलिसांची गस्त वाढविण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. 

खेळाने कामात सुसूत्रता 
दैनंदिन काम करताना आपले छंद जोपासावे, असा माझा सहकाऱ्यांना आग्रह असतो. मी स्वत: बॅडमिंटन, बुद्धिबळ, क्रिकेटची आवड आहे. रेल्वेच्या क्‍लबमध्ये सहकाऱ्यांसोबत गेम खेळताना कामांमधील अडचणी, त्यावरील उपायांवर चर्चा होते. त्यामुळे रोजचे कामही सुकर होते, हा अनुभव मी नेहमी घेतो. त्यामुळे कामाचा व्याप असला तरी खेळ, गीत-संगीताच्या आवडीतून कामातील तणाव दूर करता येतो, असे गुप्ता म्हणतात. 

शिवाजीनगर पूल, बजरंग बोगदा 
शिवाजीनगर पूल, बजरंग बोगदा ही कामे महापालिकेच्या निधीतून होणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने रेल्वेने भुसावळ-रेल्वे तिहेरी मार्गात विशेष तरतूद करून शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी 50 टक्के निधी देण्याचे सांगितले आहे, 50 टक्के निधी महापालिकेने राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास हे काम तातडीने होईल. बजरंग बोगद्यासाठीच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेकडे रक्कम जमा केली असून पुढील आठवड्यात या कामाला सुरवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com