PHOTOS : पीक नुकसानीची मालिका,आता प्रतीक्षा भरपाईची..

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 November 2019

ऑगस्ट महिन्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले. १०० टक्के नुकसान झालेल्या एक हजार १९४ पीकविमाधारक शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनी व शासनाकडे अहवाल सादर केला आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. 

नाशिक : इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर सुरवातीपासूनच नुकसानीची मालिका अखंडित पणे सुरू आहे. या नुकसानीची शासनाने दखल घेतली असून, शासकीय व प्रशासकीय स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इगतपुरी तालुक्‍यात कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे पथके तयार करून सरसकट पंचनामे सुरू केले आहेत. इगतपुरी तालुक्‍यात एकूण दोन हजार ८११ पीकविमाधारक शेतकरी आहेत. हे सर्व पीकविमाधारक शेतकरी भात उत्पादक नुकसानग्रस्त शेतकरी असून, या सर्व शेतकरी लाभार्थ्यांना नुकसानभरपाईची आस आहे. 

१०० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अहवाल कंपनीला सादर 

ऑगस्ट महिन्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले. १०० टक्के नुकसान झालेल्या एक हजार १९४ पीकविमाधारक शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपनी व शासनाकडे अहवाल सादर केला आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Image may contain: plant, tree, outdoor, nature and water

पाण्यात भात की भातशेतीत पाणी असा आभास दर्शविणारे दृश्‍य,

गेल्या १५ दिवसांपासून बेसुमार झालेल्या परतीच्या पावसामुळे व नुकत्याच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती पूर्णतः उद्‌ध्वस्त झाली. पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या व पीकविमा योजनेत सहभागी नसलेल्याही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सरसकट पंचनामे करण्यास सुरवात झाली. तहसीलदार अर्चना भाकड, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर, मंडळ अधिकारी अरविंद पगारे, अकोले आदींनीही गावनिहाय शेतीवर जाऊन पंचनामे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. 
Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature

शेतावर जाऊन पीक पंचनामा पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर व मंडळ अधिकारी अरविंद पगारे आदी

शेतकरी पूर्णतः हवालदिल
इगतपुरी तालुक्‍यात 31 हजार 700 हेक्‍टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून, त्यात 29 हजार 900 हेक्‍टर भातपिकांची पेरणी झाली होती. मात्र अतिवृष्टी, परतीचा अतिरिक्त पाऊस व अवकाळी यामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. 

Image may contain: outdoor and nature

प्रतिक्रिया  
इगतपुरी तालुक्‍यात सहाही मंडळांत पंचनामे सुरू झाले आहेत. पीकविमाधारक नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यातील जवळपास एक हजार 200 पीकविमाधारक 100 टक्के नुकसानधारक शेतकरी बांधवांचे नुकसानीबाबतचे अहवाल पीकविमा कंपन्या व शासनाला सादर करण्यात आले आहेत. उर्वरित पीकविमाधारक नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या भात व पीक कापणी प्रयोगावर पीकविमा योजनेचा लाभ अवलंबून आहे. मात्र सध्या सर्वच ठिकाणी सरसकट पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. -शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suffer from loss farmers Expect to compensate from government