अल्पवयीन मुलीचे आतेभावाशी लग्न लावण्यासाठी मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल; तिघा आतेभावांना तीन दिवस पोलीस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी

पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल; तिघा आतेभावांना तीन दिवस पोलीस कोठडी तर इतरांना न्यायालयीन कोठडी

सटाणा (नाशिक) : अल्पवयीन मुलीचे आपल्या मुलाशी लग्न लावण्यासाठी मुलीच्या आईवडीलांना बेदम मारहाण करत मुलीवर ऍसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या मुलीची आत्या, आत्याचा नवरा, तीन आतेभाऊ, आजोबा व काका यांच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून मुलीचा काका मात्र फरार आहे. आरोपींना मालेगाव येथील विशेष न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी तिघा आतेभावांना (ता. २७) पर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून आजोबा, आत्या व आत्याच्या नवऱ्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

याबाबत पिडीत मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत, माझे वय १७ वर्ष १० महिने आणि २३ दिवस इतके असून सध्या मी शिक्षण करीत आहे. माझी आत्या मंगला श्रीराम सोनवणे (रा.अजमेर सौंदाणे, ता.बागलाण) ही माझे लग्न तिचा मुलगा संतोषशी लावण्यासाठी माझ्या आई-वडिलांवर सातत्याने दबाव टाकत होती. आतेभाऊ संतोष श्रीराम सोनवणे हा, तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल, म्हणून मला सतत धमकावत असे. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या नाहीतर मी तुम्हाला गावात राहू देणार नाही. अशा वारंवार धमक्या देऊन सोनवणे कुटुंबीयांनी पीडीत मुलीचे आई, वडील आणि भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत सोनवणे कुटुंबीयांनी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईचा हात देखील मोडला. सोनवणे कुटुंबियांच्या धाकामुळे आम्हां कुटुंबीयांना गाव सोडून लखमापूर येथे स्थलांतर करावे लागले.

मुलीला मुलगा पसंत नसल्याने आम्हाला हे लग्न करायचे नाही, असे पिडीत मुलीच्या आई - वडिलांनी सोनवणे कुटुंबीयांना वेळोवेळी सांगितले. मात्र तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिचा चेहरा विद्रूप करून टाकेल. मग बघतो तुमच्या मुलीशी कोण लग्न करते ते. तू माझी नाही तर तुला कोणाचीही होऊ देणार नाही, अशी धमकी आतेभाऊ संतोष सोनवणे याने दिली. त्यामुळे पीडीत मुलीने आत्या मंगला श्रीराम सोनवणे, आत्याचा पती श्रीराम केदा सोनवणे, आतेभाऊ भगवान संतोष सोनवणे, संतोष श्रीराम सोनवणे, दीपक श्रीराम सोनवणे, आजोबा यशवंत नवसा नंदाळे, काका दिनेश यशवंत नंदाळे (सर्व रा.अजमेर सौंदाणे, ता.बागलाण) यांच्यावर पॉस्को कायद्यासह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना अटक करण्यात आली असून, मुलीचा काका दिनेश नंदाळे अद्यापही फरार आहे. सटाणा पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, पिडीत मुलीने तिच्या आईसह कुटुंबीयांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. मात्र, सटाणा पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने पिडीत कुटुंबीयांनी अखेर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यानुसार श्री. पोद्दार यांनी सटाणा पोलिसांना धारेवर धरत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने सटाणा पोलिसांनी पॉस्को कायद्यासह इतर कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Suffer to marry a minor girl child