
Nandurbar Crime News : मोटारसायकलीसाठी मुलासह सुनेची आत्महत्या; विरहामुळे पित्यानेही मृत्यूला कवटाळले
Nandurbar News : वडील मोटारसायकल घेऊन देत नाही म्हणून मुलाने पत्नीसह रेल्वेरुळावर आत्महत्या केली. सुनेसह मुलाने आत्महत्या केल्याचे दृश्य पाहून पित्याने ही रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.
एकाच कुटुंबातील तीन जणांनी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मोटारसायकलीपेक्षा जीवन एवढे स्वस्त झाले आहे का, असा विचार मनाला चटका लावून गेला. (Suicide of daughter in law with son for motorcycle father also faced death due to separation Incident at Navapur Nandurbar News)
आजकालच्या मोबाईलधार्जिण्या एकलकोंड्या युवकांना कौटुंबिक व सामाजिक बांधिलकीबाबत प्रबोधनाची गरज आहे असे वाटणे या घटनेमुळे अधोरेखित होते. नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी सावंत सय्यद गावित त्यांच्या पत्नी रोशनी सावंत गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित या तिघांनी रात्रीच्या (ता. २२) वेळेत फुलफळी भागातून जाणाऱ्या रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली.
प्राप्त पोलिस माहितीनुसार नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी सावंत सय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. मात्र वडिलांनी ती घेऊन दिली नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या विषयावरून रागाच्या भरात सावंत गावित व त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वेरुळावर आत्महत्या केली. मुलगा व सून यांनी आत्महत्या केली हे दृश्य पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वेरुळावर जाऊन आत्महत्या केली.
या घटनेबाबत कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी विकी वाघ यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून तिन्ही मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालय पाठविले आहेत. नवापूर पोलिस तपास करीत आहे.