अद्ययावत "सुखोई-30' हवाई दलात 

अद्ययावत "सुखोई-30' हवाई दलात 

नाशिक - भारतीय हवाई दलाचे कुशल अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी देखभाल- दुरुस्तीतून अद्ययावत केलेले देशातील पहिले "सुखोई-30 एमकेआय' हे लढाऊ विमान आज हवाई दलाच्या सेवेत प्रदान करण्यात आले. ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

ओझर येथील हवाई दलाच्या 11 बेस रिपेअर डेपोत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी विमानासंबंधीची माहिती हवाई दलाच्या नैर्ऋत्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी हवाई दलाचे नवी दिल्ली, नागपूर, गांधीनगरचे वरिष्ठ अधिकारी, कमांडिंग ऑफिसर समीर बोराडे आदी उपस्थित होते. 

एकमेव केंद्र 
"सुखोई-30' या लढाऊ विमानाचे 11 वर्षे आणि काही हजार तासांचे उड्डाण पूर्ण केल्यानंतर नूतनीकरण केले जाते. त्यानुसार ओझर येथील हवाई दलाच्या 11 बेस रिपेअर डेपोत एप्रिल 2015 मध्ये पहिले "सुखोई' विमान हे अद्ययावत करण्यासाठी दाखल झाले होते. येथील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अडीच वर्षांत या विमानाचे संपूर्ण अद्यावतीकरण केले. 24 एप्रिल 2018 रोजी या विमानाने यशस्वी उड्डाण केले होते. पुढे हवाई दलातर्फे अनेकवेळा चाचणी घेण्यात आली. ओझर येथील या डेपोत "मिग' आणि "सुखोई' या लढाऊ विमानांची सर्व देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येते. डेपोची स्थापना 29 एप्रिल 1974 ला झाली. त्यानंतर एक जानेवारी 1975 रोजी 11 बेस देखभाल- दुरुस्ती डेपो असे नामकरण करण्यात आले. 1983 पर्यंत "एसयू-7' जातीच्या 100 विमानांची देखभाल- दुरुस्ती केली गेली. 1983 ते 1988 पर्यंत "मिग-21' या विमानांच्या देखभाल- दुरुस्तीचे यशस्वी काम झाले. त्यानंतर "मिग-23'च्या देखभाल- दुरुस्तीच्या कामाची व्यवस्था करण्यात आली. 248 "मिग-23' लढाऊ विमानांच्या देखभाल- दुरुस्तीचे काम पूर्ण करून ती मे 2015 मध्ये हवाई दलाच्या सेवेत पाठवण्यात आली. 1996 मध्ये "मिग- 29' आणि आता "सुखोई- 30'ची देखभाल- दुरुस्ती डेपोत करण्यात येत आहे. या एकमेव केंद्रात इजेक्‍शन सीटची व्यवस्था आहे. 

"सुखोई- 30 एमकेआय'च्या अद्ययावतीकरणाची संधी मिळाल्याने अनेक नवनवीन गोष्टी शिकण्याची विभागाला संधी मिळाली. हा खूप चांगला अनुभव ठरला आहे. फेब्रुवारीमध्ये अद्ययावत करण्यात आलेले आणखी एक "सुखाई- 30' विमान हवाई दलात सहभागी होईल. 
- हेमंत शर्मा, एअर मार्शल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com