नाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा 'सुला फेस्ट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पश्‍चिम बंगालमध्ये वीसवरून दोन "ड्राय-डे' करण्यात आले आहेत. त्याबद्दलचा विचार राज्यात व्हायला हवा. तसेच "ड्राय-डे'च्या कालावधीत "टेस्टिंग रूम'मध्ये वाइनची चव चाखता यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील आंतरराज्य करामधील तफावत दूर व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. परदेशातील वाइन देशामध्ये मोठ्या प्रमाणात येणार नाही, याची काळजी कर वाढवून घेण्यात आली आहे. त्याबद्दल सरकारने पुनर्विचार करू नये, अशी अपेक्षा आहे. पुनर्विचार करावयाचा झाल्यास स्वस्त वाइनवरील आयातकर कमी करण्यास हरकत असण्याचे कारण नाही.
- राजीव सामंत, अध्यक्ष, सुला विनियार्ड

नाशिक : नाशिकच्या अर्थकारणाला चालना देणारा सुला विनियार्डचा "सुला फेस्ट' सुरू आहे. तीन दिवस जागतिक सांगीतिक महोत्सवामध्ये देश-विदेशातील पर्यटकांपुढे देश-विदेशातील नामवंत कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करीत आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी सकाळी साडेआठला विनियार्ड ते गंगापूर धरण असा धावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच योगा कार्यक्रमात पर्यटक सहभागी होतील.

"सुला फेस्ट' अंतिम टप्प्यात पोचला असून, देश-विदेशातील पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना सुला विनियार्डचे अध्यक्ष राजीव सामंत यांनी सुला विनियार्डच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणात नव्याने उभारण्यात आलेले 25 खोल्यांचे रिसॉर्ट महिनाभरात पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, की दशकपूर्ती साजरा करत असलेल्या महोत्सवामध्ये 27 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील. त्यात नाशिककरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहील. शिवाय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून यंदा महोत्सवाचा एक दिवस वाढविला आहे. महोत्सवामध्ये तीन रंगमंच असतील. त्यातील एका रंगमंचावर कलाकारांचे थेट सादरीकरण होईल. उरलेल्या दोन रंगमंचांवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स सांगीतिक मेजवानी असेल. उद्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कलावंत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कलावंत संगीताचे सादरीकरण करणार आहेत.

व्वा! किती सुंदर!! लाजवाब!!!
द्राक्षबागांच्या सान्निध्यातील महोत्सवाची आखीव-रेखीव मांडणी पाहून येथे आल्यावर पर्यटकांनी "व्वा! किती सुंदर!! लाजवाब!!!' अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदविली, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, की द्राक्षांच्या 350 उत्पादकांना सुला विनियार्ड जोडून घेतले आहे. दर वर्षी 200 ते 400 एकरांवर वाइनसाठी लागणाऱ्या द्राक्षबागांची उभारणी होत आहे. तसेच दरकराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षांच्या भावात पाच ते सात टक्‍क्‍यांनी वाढ केली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर छोट्या वाइन उत्पादकांना एनपीएमधून बाहेर काढण्यासाठी सुला विनियार्डने मदत केली आहे.

वाइन महोत्सव विस्तारण्याचा प्रस्ताव
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यंदाच्या महोत्सवाला मदत केली आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सुला विनियार्डला वर्षाला अडीच लाखांपर्यंत पर्यटकांनी भेट दिल्याबद्दल कौतुक केले आहे. आता राज्यातील विविध शहरांमध्ये वाइन महोत्सव करण्याचा प्रस्ताव महामंडळातर्फे देण्यात आला आहे. शिवाय महोत्सवाने सरकारी यंत्रणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. सुला विनियार्डचे उपाध्यक्ष मोनित ढवळे उपस्थित होते.

गोवा-कॅलिफोर्नियाची अनुभूती
सुला विनियार्डच्या परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या रिसॉर्टसाठी 15 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. "ट्री-हाउस'ची चार ठिकाणी उभारणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, रशियन वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र-गोवा-कॅलिफोर्नियाची अनुभूती घेता येईल, अशी रचना आहे. सुदृढ आरोग्य, निसर्गाचे लावण्य, दर्जेदार खाद्य याची काळजी रिसॉर्टची उभारणी करताना घेण्यात आली आहे.

Web Title: sula vineyard festival boosts nashik's economy