एप्रिलमध्ये ४३ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

Summer
Summer

पारा ४६ अंशांवर; सूर्यदेव कोपल्याने जळगावात अघोषित संचारबंदी
जळगाव - उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘मे हीट’चा तडाखा बसण्यापूर्वीच सूर्य आग ओकत असल्याने ‘हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. यामुळे जळगावातील पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला असून, आज पारा ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यंदा जिल्ह्यात नोंद झालेले तापमान हे गेल्या चाळीस वर्षांनंतर उच्चांकी आहे.

गेल्या आठवडाभरापासून सूर्याने आग ओकण्यास सुरवात केली आहे. यामुळे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सात- आठ वर्षांत जळगावातील तापमान ४३- ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले होते. यात एप्रिल २०१६ मध्ये उच्चांकी तापमान नोंदले गेले होते. मात्र, गेल्या चाळीस वर्षांनंतर प्रथमच ‘रेकॉर्डब्रेक’ तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे.

एप्रिल १९७६ मध्ये ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ममुराबाद येथील हवामान खात्याकडे झाली होती. त्यानंतर प्रथमच जळगावचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. साधारण चार- पाच दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वसाधारण तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यात आज जळगाव शहरातील तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे.

अघोषित संचारबंदी
वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारी बाहेर निघण्याचे टाळले जात आहे. यामुळे शहरासह परिसरातील रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. यात आज रविवार असल्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांवरील वर्दळ थांबलेली होती. यामुळे सर्वत्र अघोषित संचारबंदी लागल्याचा अनुभव येत होता. 

कूलरची मागणी वाढली
उष्णतेची दाहकता कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उकाडा सहन होत नसल्याने गारवा मिळविण्यासाठी घरात कूलर- एसी लावले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ‘एसी’ घेणे शक्‍य होत नसल्याने ‘डेझर्ट कूलर’ला पसंती दिली जात आहे. यामुळे गेल्या पंधरवड्यात मंदावलेला कूलरचा व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com