पाचव्या संशयिताला गुन्ह्यातून का वगळले? 

निखिल सूर्यवंशी
गुरुवार, 20 एप्रिल 2017

धुळे - मांडूळ जातीच्या दुतोंडी सापाच्या तस्करी प्रकरणी साक्रीच्या वन विभागाने चौघांना गजाआड केले. मात्र, पाचवा शिरपूर तालुक्‍यातील संशयित या गुन्ह्यातून सहीसलामत सुटल्याचे बोलले जाते. यामागच्या कारणांचा शोध राज्य सरकारनेही घ्यावा आणि वस्तुस्थितीची उकल करावी, अशी मागणी होत आहे. 

धुळे - मांडूळ जातीच्या दुतोंडी सापाच्या तस्करी प्रकरणी साक्रीच्या वन विभागाने चौघांना गजाआड केले. मात्र, पाचवा शिरपूर तालुक्‍यातील संशयित या गुन्ह्यातून सहीसलामत सुटल्याचे बोलले जाते. यामागच्या कारणांचा शोध राज्य सरकारनेही घ्यावा आणि वस्तुस्थितीची उकल करावी, अशी मागणी होत आहे. 

मांडूळ सापाची जिल्ह्यात काही वर्षापासून बिनदिक्कतपणे तस्करी सुरू आहे. तिची काही गावे प्रमुख केंद्र ठरली आहेत. ही माहिती वन विभागाला नसेल, यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही. सातत्याने डोळेझाक होत गेल्याने तस्करांचे पाय जिल्ह्यात विस्तारले. धुळे तालुक्‍यानंतर संपूर्ण धुळे जिल्हा आणि लगतचा नंदुरबार जिल्हाही या सापाच्या तस्करीमुळे ओळखला जाऊ लागला. येथे तर शिरपूर तालुक्‍यापर्यंत तस्करीची पाळेमुळे रुजली आहेत. 

कारवाईचे स्वागत पण... 
मांडूळ सापाची तस्करी होत असल्याची माहिती साक्री वन विभागाला मिळाली. साक्री-निजामपूर रस्त्यावरील रायपूरबारीत31मार्चला सायंकाळी ही कारवाई झाली. संशयास्पद इंडिका कार (एम.एच18/डब्ल्यू8207 ) वन विभागाच्या पथकाने थांबविली आणि त्यावेळी माती भरलेल्या गोणपाटात बंदिस्त करण्यात आलेला मांडूळ साप आढळला. पथकाने शांताराम आत्माराम चौधरी (रा. होळनांथे ता. शिरपूर), दस्तगीर मंजूर मौले (रा. भावेर ता. शिरपूर), भारत साहेबराव बेडसे (रा. शिरपूर) आणि किशोर नारायण मराठे (रा. शेलंबा ता. सागबारा, गुजरात) यांना ताब्यात घेतले. या कारवाईचे स्वागतही झाले. पण या प्रकरणात अन्य एकाचाही समावेश होता. तो चौघा संशयितांचा साथीदार होता. काही दिवसांनी त्यालाही अटक केली जाईल, असे वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र, ते काही दिवस उलटून महिना झाला. तरीही तो पाचवा संशयित अद्याप मोकाट आहे. 

मंत्रालयातूनही दबाव? 
तो पाचवा संशयित शिरपूर तालुक्‍यातील होळनांथे येथील असल्याची चर्चा आहे. कोणी किरण नामक संशयित चौघा संशयितांबरोबर होता. तो का सहीसलामत सुटला? मंत्रालयातून नेमका कुणाचा दबाव होता? आदी चर्चेतील प्रश्न अद्याप निरुत्तर आहेत. मुळात अशी चर्चा होणेही गंभीर असून ती दुर्लक्षित करण्यासाठी नाही. या सर्व प्रकाराची सखोल चौकशीची गरज व्यक्त होत आहे. अंधश्रद्धेसह काही गैरसमजुतीतून मांडूळ सापाची तस्करी होत आहे. वजन आणि लांबीवर हा साप लाखोंच्या किमतीला विकला जातो. गुप्तधनाचा शोधक व धनसंचयासाठी या सापाची चोरट्या मार्गाने तस्करी होते. ती रोखून जनमानसाचे प्रबोधन करण्याऐवजी काही अधिकारी, कर्मचारी संगनमताने पैसा कमविण्यासाठी या सापाचे अस्तित्व धोक्‍यात आणत आहेत.

Web Title: superstition issue